चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून हा आनंद साजरा केला. ‘गेली तीन-चार वर्षे आमची टीम केवळ चांद्रयान ३चाच विचार करत होती. त्यांचा श्वास अन् श्वास, खाणे, पिणे यामध्ये केवळ चांद्रयान-३ व्यापले होते. आता आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत. उद्या आम्ही आणखी एका मोहिमेसाठी सज्ज होऊ,’ असे बंगळुरूस्शित यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक एम. शंकरन यांनी सांगितले.
‘चांद्रयान-२ बांधल्यानंतर जेव्हा आम्ही चांद्रयान ३ अंतराळयान बांधण्याच्या कामाला सुरुवात केली, तेव्हापासून आमच्या टीमने केवळ त्याचाच ध्यास घेतला होता,’ अशी प्रतिक्रिया प्रकल्पाच्या उपसंचालक कल्पना के यांनी व्यक्त केली.
इस्रोचे संचालक एस. सोमनाथ यांच्यापासून ते पथकातील अन्य सदस्यांची ही ओळख…
इस्रोचे संचालक एस. सोमनाथ : जानेवारी १४, २०२२ रोजी इस्रोचे संचालक म्हणून पदभार स्वीकारण्याआधी एस. सोमनाथ हे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्थेचे संचालक होते. चांद्रयान-२च्या रॉकेटच्या दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळेच २२ जुलै, २०१९ रोजी हे रॉकेट पुन्हा प्रक्षेपित करण्यास यश आले होते. चांद्रयान-२चे यश थोडक्यात हुकल्यानंतर सोमनाथ यांनी चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा निर्णय घेतला होता. ‘यश साध्य करण्यापेक्षा अपयशी होऊ नये, यावर आम्ही लक्ष केंद्रित केले, ’ असे ते सांगतात.
१४ जुलै, २०२३ रोजी एलव्हीएम ३ रॉकेटने उड्डाण केल्यानंतर हे अंतराळयान योग्य कक्षेत स्थिरावले आणि अधिक इंधनाची गरजही भासली नाही. तेव्हा आमच्या इस्रोच्या पथकाला चांगले यश मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली. अंतराळयान खूप वेगात प्रवास करत होते आणि चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे हे खूप आव्हानात्मक होते. परंतु कोणत्याही अडथळ्याविना आम्ही हे आव्हान पूर्ण केल्याचे ते सांगतात.
नीलेश देसाई (संचालक, स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर, सॅक/इस्रो, अहमदाबाद)
अंतराळयानाचे महत्त्वाचे भाग तयार करण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. अंतराळयानातील ११ सेन्सर बनवण्याचे काम देसाई यांच्या पथकाने केले. त्यातील आठ हे अत्यंत अद्ययावत कॅमेरे आहेत. यावेळी लेझर डॉपलर व्हेलोसीमीटर (एलडीव्ही) हे नवीन उपकरण सादर करण्यात आले. ज्यामुळे चाचणीदरम्यान वेग अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तीन दिशांनी उंची मोजता येते, असे त्यांनी सांगितले.
उन्नीकृष्णन नायर (केरळस्थित विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र)
एलव्हीएम-३ रॉकेटच्या विकासामागे उन्नीकृष्णन ही व्यक्ती आहे, या रॉकेटला इस्रोचा बाहुबलीदेखील म्हणतात. या रॉकेटनेच श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ अंतराळयानाला घेऊन अवकाशात झेप घेतली होती. ‘चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे कारण म्हणजे अनपेक्षित गोष्टींचा शोध घेणे. आमच्या चांद्रयान १ आणि चांद्रयान २ ला उंचावरून चंद्रावर ज्या ठिकाणी पाण्याचे पुरावे मिळाले होते, त्या प्रदेशाचा आम्हाला अधिक शोध घ्यायचा होता. एलव्हीएम-३ने एक विश्वासार्ह प्रक्षेपक म्हणून स्वतःची क्षमता सिद्ध केल्यामुळे आम्ही केवळ चंद्रावरच नव्हे तर सूर्य आणि शुक्रावरही आणखी मोहिमा प्रक्षेपित करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ए. राजराजन (‘सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा’चे संचालक)
श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ स्थानकावरून एसएसएलव्ही ते एलव्हीएम -३ रॉकेटपर्यंत सर्व यशस्वी प्रक्षेपणामागे राजराजन हा माणूस आहे. ‘इस्रोने आता चंद्रावर हळूवार स्पर्श करून ‘सॉफ्ट-लँडिंग’चे तंत्रज्ञान प्राप्त केल्याचे या यशस्वी मोहिमेवरून सिद्ध झाले आहे. हे यश साध्य करण्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी टीम इंडियाने स्वतःला सिद्ध केले,’ असे ते सांगतात. ‘आज आपण चांद्र मोहिमेच्या यशानंतर आनंद साजरा करत आहोत, उद्या आम्ही दुसर्या मोहिमेसाठी सज्ज होणार आहोत. पंतप्रधान मोदी आणि इस्रोच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला आदित्य एल१ मिशनची योजना आखण्याची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार
जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे रॅगिंग हेच कारण
विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!
चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर
शंकरन (यू. आर राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक)
यूआरएससी आणि इस्रोमधील त्यांच्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यतः सोलर अॅरे, पॉवर सिस्टम, सॅटेलाइट पोझिशनिंग सिस्टम आणि लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांसाठी आरएफ कम्युनिकेशन सिस्टीम, नेव्हिगेशन उपग्रह आणि चांद्रयान, मार्स ऑर्बिटर मिशनसारख्या बाह्य अवकाश मोहिमांसाठी योगदान दिले आहे. “गेल्या तीन ते चार वर्षांपासून आमच्या टीमने चांद्रयान-३चाच ध्यास घेतला होता. आता आमचे पुढील लक्ष्य अंतराळात मानवाला नेण्याचे आहे. तसेच, शुक्र व मंगळावर आम्हाला अंतराळयान पाठवायचे आहे,’ असा आशावाद दे व्यक्त करतात.
पी. वीरामुथुवेल (चांद्रयान-३ प्रकल्प संचालक)
वीरामुथुवेल हे त्यांच्या तांत्रिक कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांनी चांद्रयान-२ मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘हा मोठा आनंदाचा क्षण आहे. प्रक्षेपणापासून ते लँडिंगपर्यंतचे संपूर्ण मिशन ऑपरेशन वेळेनुसार निर्दोषपणे पार पडले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कल्पना के (उपप्रकल्प संचालक)
एक एरोस्पेस अभियंत्या असणाऱ्या कल्पना यांनी विविध उपग्रहांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि चांद्रयान-२ आणि मंगळयान मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. “हा आपल्या सर्वांसाठी सर्वात संस्मरणीय आणि आनंदाचा क्षण आहे. आम्ही आमचे ध्येय निर्दोषपणे साध्य केले आहे. आमच्या चांद्रयान-३ टीमच्या अथक परिश्रमामुळे हे घडले,’ अशा शब्दांत कल्पना यांनी भावना व्यक्त केल्या.