शत्रूंचा नायनाट करण्यासाठी भारताने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हेरॉन मार्क २ चा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीनच्या भारतालगतच्या दोन्ही सीमांवर नजर ठेवू शकणार आहेत.
हेरॉन मार्क -२ चे संचलन करणाऱ्या स्क्वॉड्रनला ‘वॉर्डन ऑफ द नॉर्थ’ म्हणून ओळखले जाते. ही नवी ड्रोन लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रांनी सज्ज आहेत. या ड्रोनना उत्तर क्षेत्रातील एका फॉरवर्ड हवाई तळावर तैनात करण्यात आले आहे.
भारतीय हवाई दल भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत ‘प्रोजेक्ट चिता’ला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. त्यानुसार, भारताच्या सशस्त्र दलाच्या सुमारे ७० हेरॉन ड्रोनना उपग्रहाशी जोडून कार्यान्वित केले जाणार आहे. हे दोन्ही ड्रोन लांबच्या अंतरावर तब्बल ३६ तास कार्यक्षम राहू शकतात. उंचावरील लक्ष्य गाठण्यासाठी आणि तेवढ्या कठोर वातावरणातही कार्यान्वित राहण्याची क्षमता असलेले ३१ प्रीडेटर ड्रोनही भारताला मिळणार आहेत.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत १० हजारांहून अधिक जवान तैनात
मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक
महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
जाधवपूर विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या डायरीतील पत्र चर्चेत
‘हेरॉन मार्क ड्रोन २ हे खूप सक्षम ड्रोन आहेत. यामध्ये संपूर्ण देशावर एकाच ठिकाणाहून देखरेख केली जाऊ शकते. आपले लक्ष्य गाठण्यासाठी आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी कोणत्याही हवामान परिस्थितीत आणि कोणत्याही भौगोलिक परिसरात काम करण्यास हे ड्रोन सक्षम आहेत,’ अशी माहिती ड्रोन स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर पंकज राणा यांनी दिली.
‘भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल केलेले हेरॉन मार्क ड्रोन २ यांची क्षमता आधीच्या ड्रोनपेक्षा अधिक चांगली आहे. सन २०००च्या सुरुवातीला भारतीय हवाई दलाने हेरॉन ड्रोनला ताफ्यात समाविष्ट केले होते,’ असे हेरॉन मार्क- २ या ड्रोनचे वैमानिक अर्पित टंडन यांनी सांगितले.