घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना, पंखा तुटून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या २५ वर्षांचा होता.
इब्राहिम शेखने इतक्या लहान वयात चक्क हेलिकॉप्टर बनवलं होतं. या हेलिकॉप्टरची ट्रायल सुरु होती. त्यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्रही होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरु केलं. त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी वेग घेतला. हेलिकॉप्टर हवेत झेपावणार असं वाटत असतानाच घात झाला. हेलिकॉप्टरचे पंखे तुटले.
तुटलेले पंखे थेट पायलट केबिनवर जोरदार आदळले. कुणालाही काही कळण्यापूर्वीच या पंख्यांनी इब्राहिमवर मोठा आघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. फॅन तुटून इब्राहिमच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. इब्राहिमचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
अवघ्या २५ व्या वर्षात तरुण मुलं नोकरीच्या शोधात किंवा करिअरच्या धामधुमीत व्यस्त असतात. मात्र इब्राहिमने ३ इडियट्समधल्या रँचोप्रमाणे स्वत: काहीतरी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्नही सत्यात उतरलं. त्याने हेलिकॉप्टर बनवलं. मात्र तेच स्वप्न त्याचा घात करेल असं कुणालाही वाटलं नसेल.