‘गुलाब’ चक्रीवादळामुळे १६ जणांनी गमावले प्राण; जनावरे, घरांचेही झाले मोठे नुकसान

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे १६ जणांनी गमावले प्राण; जनावरे, घरांचेही झाले मोठे नुकसान

‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागात जाणवला. मंगळवारी (२८ सप्टेंबर) मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मुंबई, ठाणे परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १०, विदर्भात पाच आणि नाशिकमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची दाणादाण उडाली.

मराठवाड्यात सोमवारी (२७ सप्टेंबर) रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. नदी दुथडी भरून वाहू लागल्या होत्या, तर धरणेही तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यात २०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला, तर शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’ने पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुटका केली.

हे ही वाचा:

लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!

…असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा…

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळला सुध्दा मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या जिल्ह्यांमधील काही धरणांचे दरवाजे उघडले असून, काही रस्ते अतिवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यवतमाळमधील उमरखेद- पुसद मार्गावर नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना त्यातून बस नेण्याचा प्रयत्न चालकासह चार जणांच्या जीवावर बेतला. बुलढाणा जिल्ह्यात एका नागरिकावर वीज पडून त्यात त्याचा मृत्यू झाला.

मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाने दुपारनंतर काही ठिकाणी चांगलाच जोर धरला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास कुर्ला एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने काही बस अन्य मार्गावर वळवण्यात आल्या. हा मार्ग पूर्वपदावर येण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत सुरू होत्या.

Exit mobile version