मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, अद्याप काही काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील कोकणासह मुंबई, ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागासह पालघर, ठाणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत रात्रभर पावसाची हजेरी असून सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रेल्वे वाहतूकही उशिराने होत आहे. हा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात पुढील पाच दिवस वाऱ्यांचा वेग जास्त राहणार आहे.

हे ही वाचा:

जगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची

कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी

कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी

वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान

नांदेड, यवतमाळ, गोंदिया येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. नांदेड जिल्ह्यात सुमारे ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली आहे. यवतमाळमध्ये मात्र काही ठिकाणी पावसाचे पाणी बाजार पेठेतील दुकानात शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर, गोंदियामध्ये नद्यांना पूर आला असून काही गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे.

Exit mobile version