भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘प्रणब माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी झाले. त्यावेळी प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीबद्दल समर्थन व्यक्त केले होते.
माजी आयएएस अधिकारी पवन वर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठा यांनी या आठवणींना उजळा दिला. ‘प्रणब मुखर्जी हे आरएसएसच्या मुख्यालयाला भेट देणार असल्यामुळे आम्ही तीन ते चार दिवस भांडत होतो. मात्र ते एकदा म्हणाले. त्यांना वैधता देणारा मी कोण? देशच याबाबत निर्णय घेऊ शकतो. लोकशाहीमध्ये संवादाला महत्त्व असते आणि हे पाऊल म्हणजे विरोधी पक्षांशी संवाद साधणे हे आहे,’असे प्रणब मुखर्जी त्यांच्या मुलीला म्हणाले होते. ‘आरएसएसच्या मुख्यालयाला भेट देऊन ते आरएसएसला वैधता बहाल करत आहेत, अशी टीका तेव्हा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केली होती.
हे ही वाचा :
कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापनेचे पोलिसांना आदेश
हमासची उत्तर गाझामध्ये शरणागती… इस्रायलचा दावा
मात्र ‘आरएसएसला वैधता बहाल करणार मी कोण?’, अशी विचारणा त्यांनी केली. दुसरी बाजू ऐकून घेण्याचे महत्त्व ते जाणून होते म्हणूनच त्यांना सुसंवादक संबोधले जाई, अशी आठवण शर्मिष्ठा यांनी काढली.राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१३मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका अध्यादेशाची प्रत फाडली होती. मुखर्जी यांचाही या प्रस्तावित अध्यादेशाला विरोध होता. मात्र यावर संसदेत चर्चा व्हायला हवी, असे मुखर्जी यांचे मत होते, असे शर्मिष्ठा यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला, हे प्रणब मुखर्जींना सांगणारी पहिली मी होते. हे ऐकून ते खूप संतापले होते, असे शर्मिष्ठा म्हणाल्या.
“राहुल गांधी यांनी अध्यादेशाची प्रत फाडणे हे उद्धटपणाचे आणि राजकीय अपरिपक्वतेचे वर्तन होते, यावर कोणीच नकार देणार नाही. माझे वडीलही या अध्यादेशाच्या विरोधात होते. मात्र त्यांनी तो फाडल्याचे ऐकून ते संतापले. असे वर्तन करणारे राहुल गांधी कोण आहेत? ते कॅबिनेटमध्ये मंत्रीही नाहीत,’ अशी टीका मुखर्जी यांनी केली होती, असे शर्मिष्ठा म्हणाल्या.
मुखर्जी यांच्या डायरीचे संदर्भ घेऊन शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रणब मुखर्जींच्या जयंतीचे औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम आणि भाजपचे नेते विजय गोयल उपस्थित होते.