कधी कधी काही गोष्टी स्वप्नवत वाटतात, पण त्या प्रत्यक्षात जेव्हा घडतात तेव्हा मात्र अशी स्वप्नंही पूर्ण होऊ शकतात यावर विश्वास बसतो. असाच एक प्रसंग घडला भावेश झवेरी यांच्यासोबत. केवळ १८ हजारांमध्ये झवेरी यांनी एकट्याने विमानातून प्रवास केला. बोईंग ७७७ या एमिरेटस कंपनीच्या विमानातून मुंबईहून दुबईला निघाले होते. परंतु विमानामध्ये ते केवळ एकटेच प्रवासी होते. एकूणच कोरोनाचा कार्यकाळ पाहता त्या विमानात त्यांच्यासोबत अजून कुणीच नव्हते.
एकट्याने प्रवास करण्याचा त्यांचा अनुभव हा नक्कीच अवर्णनीय होता. नेहमीप्रमाणे विमानातील केबिन क्रुने त्यांचे स्वागत केले. पण या विमानात सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की, केबिन क्रु झवेरी यांच्या नावाने त्यांना सूचना देत होता. जणू काही अख्खे विमान त्यांनीच बुक केले होते. भावेश झवेरी यांनी १९ मेला मुंबईहून दुबईला जाण्यासाठी तिकीट काढले. मुंबई ते दुबई हा प्रवास त्यांचा नेहमीचाच होता. त्यामुळे दुबईला जाणे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. ४० वर्षीय भावेश झवेरी विमानात आतमध्ये गेल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. केवळ एकटेच भावेश झवेरी विमानातून प्रवास करणार होते, त्यामुळे केबिन क्रु तसेच पायलट या सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता.
हे ही वाचा:
व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच
बारावी परीक्षेवरून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
आरेच्या!! सीईओच्या घरात सापडली साडेतीन कोटीची बेहिशोबी रोकड
सप्टेंबरमध्ये परतणार आयपीएलचे धुमशान
स्टारगेम्स या कंपनीचे सीईओ असलेले झवेरी यांना त्यांच्या दुबईच्या कार्यालयात जायचे होते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा मुंबई ते दुबई अशी ये जा केलेली होती. पण हा अनुभव मात्र नक्कीच वेगळा होता असे ते म्हणतात.
मुंबई ते दुबई दरम्यान गेल्या दोन दशकांत २४० फ्लाइटमधून त्यांनी प्रवास केलेला आहे. पायलटही त्यांच्याकडे गप्पा मारायला आला होता असंही ते म्हणाले.
मुंबई ते दुबई ही विमानसेवा कायम व्यस्त विमानसेवा म्हणून ओळखली जाते. परंतु कोरोना महामारीमुळे या विमानसेवेलाही फटका बसला. युएईने लागू केलेल्या सध्याच्या निर्बंधानुसार केवळ त्याचे नागरिक आणि युएई गोल्ड व्हिसा धारक आणि राजनैतिक मोहिमांचे सदस्य भारतातून युएईला ये जा करू शकतात. झवेरी हे स्वतः गोल्ड व्हिसाधारक असल्यामुळे त्यांच्यासाठी प्रवासावर कोणतेच निर्बंध नव्हते.
या अनुभवासंदर्भात अधिक बोलताना झवेरी म्हणाले, “ गेल्या जूनमध्ये दुबईहून मुंबईकडे येण्यासाठी एका चार्टर विमानाने प्रवास केला होता. ज्यामध्ये १४ आसनी विमानात माझ्यासह केवळ ९ प्रवासी होते. परंतु हा अनुभव काही वेगळाच होता असे त्यांनी यावेळी नमूद केले.