तब्बल २० तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सुनील पिसाळ (३२) या कामगाराचा जीव वाचला. त्यानंतर त्याच्या जन्मदिनीच त्याचा पुनर्जन्म झाल्याची भावना व्यक्त होत आहे. भिवंडीत शनिवारी इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. इमारतीच्या डेब्रिजखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सोमवारीही सुरू होते.
राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ) आणि ठाणे आपत्ती निवारण पथकातील कर्मचाऱ्यांनी पिसाळ याला जेव्हा सोमवारी सकाळी आठ वाजता बाहेर काढले, तेव्हा त्याने सर्वांसमोर हात जोडले आणि त्याला दुसरे जीवन दिल्याबद्दल आभार मानले. त्याला रुग्णालयात नेले जात असताना त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी एकच जल्लोष केला. त्याची पत्नी अकिला ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून तिला याबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते.
भिवंडीत कामगार म्हणून काम करणारा सुनील हा तेथील गोदामात सामान ठेवत असताना ही इमारत कोसळली. ‘मी भिंत आणि कोसळलेला स्लॅब यांच्या दरम्यान असलेल्या छोट्या फटीत अडकलो होतो. त्यामुळे मला कोणीच शोधू शकणार नाही, अशी चिंता मला वाटत होती. पण जेव्हा मी बचाव पथकाचा आवाज ऐकला तेव्हा मी मदतीसाठी जोरात किंचाळलो आणि त्यांनी मला बाहेर काढले. हे २० तास मी कधीही विसरू शकणार नाही,’ असे सुनील म्हणाला.
हे ही वाचा:
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या पार्टनरला अटक
मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले
उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!
नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !
’२० तास अडकल्यानंतरही आम्ही सुनीलला बाहेर काढू शकलो, याचा आम्हाला फार आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया एनडीआरएफचे उप कमान्डन्ट दीपक तिवारी यांनी दिली. या इमारतीची बांधणी एका पॅनकेकसारखी होती. त्यामुळे इमारतीचे खांब मध्यभागी कोसळले. अशा प्रकारच्या अपघातांत पुरेशा ऑक्सिजनअभावी अडकेलल्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता फार कमी असते, असे ते म्हणाले. त्यामुळे सुनील या अपघातातून वाचल्यामुळे सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.