फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका भाजीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरुद्ध जोरदार मोहीम चालू केली होती. महापालिकेच्या कारवाईमुळे रस्त्यांवरील फेरीवाले गायब झाले होते. मात्र, आता रस्त्यांवर पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत. विशेषतः पिंपळे यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला होता, त्या कासारवडवली भागातील रस्त्यांवर फेरीवाले पुन्हा बसू लागले आहेत.
पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. रस्ते, पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यासह हातगाड्या, टपऱ्या तोडण्यात आल्या. प्रत्येक प्रभागामध्ये पालिकेने मोहीम तीव्र केली होती. पालिकेच्या यी कारवाईमुळे फेरीवाले दिसेनासे झाले होते. रस्ते आणि पदपथ मोकळे झाले होते. मात्र आता पुन्हा फेरीवाले रस्त्यांवर दिसू लागले आहेत.
हे ही वाचा:
‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु
अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात
अ.भा.आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरींच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये
अनेक ठिकाणी मार्केट नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आणि फळे- भाजी खरेदीसाठी नागरिक फेरीवाल्यांकडे जातात. त्यामुळे पालिकेने अधिकृत मार्केट उभारणे गरजेचे आहे, अशा चर्चा आता ठाण्यात सुरू आहेत. फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू असून सध्या गणेशोत्सवामुळे कर्मचारी अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने गेल्या दहा दिवसांत फारश्या कारवाया झालेल्या नाहीत. आता कारवाईला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि त्याविषयी सूचना दिलेल्या आहेत, असे ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.
कासारवडवली भागात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाणे महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. या कारवाई दरम्यान अमरजीत यादव या फेरीवाल्याने चाकूने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तर पालवे यांच्या हाताचे एक बोट तुटले होते. पोलिसांनी कारवाई करत यादवला अटक केली होती. त्यानंतर पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती.