कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी मुंबईकारांकडून केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्या तुलनेत कारवाई मात्र कमी केली जाते, असे चित्र आहे. कोरोना संकटाचा फायदा घेत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई शहर व उपनगरात तीन लाखांहून अधिक फेरीवाले असल्याचा अंदाज असून यातील ७० टक्के फेरीवाले हे स्थानकांच्या परिसरात आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र या आदेशाचे पालन कुठेही होत असताना दिसत नाही. दादर, अंधेरी, कांदिवली, कुर्ला, बोरिवली, घाटकोपर या परिसरातील रस्ते पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात मुंबईतील सर्वाधिक फेरीवाले बसतात. पालिकेने कारवाई केल्यानंतर अधिकाऱ्यांची पाठ वळताच फेरीवाले पुन्हा बसत असल्याने पालिकेसाठीही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
हे ही वाचा:
कोरोना चाचणी अहवालासाठी धावताहेत चाकरमानी
करायचे तरी काय? कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह; मग निगेटिव्ह
भारताचे पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण
मुंबईतील बहुसंख्य फेरीवाले हे अधिकृत दुकानांसमोर बसून व्यवसाय करत असतात. त्यामुळे अनेकदा लोकही स्वस्तात म्हणून यांच्याकडूनच खरेदी करत असतात. त्यामुळे या फेरीवाल्यांचा अधिकृत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना त्यांचा त्रास होत आहे. फेरीवाल्यांना जागेचे भाडे, वीज, पाणी, कर्मचारी वेतन यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. पालिकेच्या कारवाई सतत होत नसल्याने फेरीवाल्यांची मग्रुरी वाढली आहे, असे मराठी व्यापारी पेठेचे अनंत भालेकर यांनी सांगितले.
फेरीवाल्यांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले नवे नाहीत. कारवाईसाठी संबंधित अधिकारी पोलीस संरक्षण मागून घेतात. पोलिसांकडून ते दिले जाते. कोरोना काळातही अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे, असे मुंबई महापालिका परवाना विभागाचे अधीक्षक शरद बांडे यांनी सांगितले. ठाण्यातील घटना दुर्दैवी आहे. मात्र कुठल्याही महापालिकेत हप्ता घेऊनच धंदा करू दिला जातो. कोरोना काळात फेरीवाल्यांचे हाल होत असून कारवाया थांबलेल्या नाहीत, असे आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंह यांनी सांगितले.