गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कोरोनाची दुसरी लाट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १६,६२० नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १६,००० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याची ही या वर्षातील पहिलीच वेळ आहे. मागील सर्वात जास्त रुग्णवाढ १५,८१७ रुग्णांसह १२ मार्च रोजी नोंदली गेली होती. याबरोबरच राज्यात ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्याचा मृत्युदर सध्या २.२८ टक्के आहे. राज्यात ८,८६१ रुग्ण बरे झाले. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.२१ टक्के आहे. सध्या ५ लाख ८३ हजार ७३१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर ५,४९३ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार २३१ झाली आहे.
हे ही वाचा:
नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय
मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरूवात
इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?
महाराष्ट्रातील विविध भागात रुग्णवाढ होताना आढळत आहे. औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरात मोठ्या प्रमाणातील रुग्णवाढ नोंदली गेली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या शहरांत विविध स्तरावरील टाळेबंदी देखील करण्यात आली आहे.
यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत हॉटेल, बार, रेस्टॉरंट मालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेणार नसल्याचे देखील सांगितले होते. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा टाळेबंदी करावी लागू शकते असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. सध्या मुंबईवर देखील नाईट कर्फ्युची टांगती तलवार आहे.