24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारताला अखेर “मध्यम मार्ग” मिळाला आहे का ?

भारताला अखेर “मध्यम मार्ग” मिळाला आहे का ?

Google News Follow

Related

श्रीकांत पटवर्धन

प्रख्यात लेखक, (बेस्ट सेलर) कादंबरीकार, आणि अलीकडे काही काळापासून राजकीय सामाजिक घडामोडींचे विश्लेषक, प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे स्तंभलेखक – चेतन भगत – या नावाला खरेतर फारशा प्रस्तावनेची गरज नाही. विशेषतः राजकीय विश्लेषक या स्वरूपातील त्यांचे लिखाण हे नेहमीच अत्यंत तटस्थ, निष्पक्ष व संयमित असते. तुम्ही कोणत्याही पक्षाचे / बाजूचे असा; चेतन भगत एखाद्या मुद्द्यावर काय लिहितात, ते बघणे सर्वांनाच काहीतरी सकारात्मक देऊन जाते. त्यामुळेच त्याची दखल घेणे क्रमप्राप्त असते. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकींच्या निकालांच्या संदर्भात त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया मधील एका लेखात केलेले विवेचन सामान्य माणसाच्या दृष्टीने वाचनीय, तर राजकीय कार्यकर्ते, नेते यांच्यासाठी चिंतनीय म्हणावे असे आहे. ‘न्यूज डंका’च्या वाचकांसाठी त्याचा सारांश इथे देत आहोत:

इंग्रजीमधील “परीकथा” साहित्यात “गोल्डीलोक्स” नावाची एक परीकथा फार गाजलेली आहे. तिच्या दोन तीन वेगवेगळ्या आवृत्त्या (Versions) असल्या, तरी मथितार्थ पुष्कळसा एकच; तो असा की दोन्ही बाजूंचा अतिरेक टाळून, जो मधला किंवा मध्यम मार्ग असतो, तो नेहमी चांगला व म्हणूनच स्वीकार्य. ही परीकथा इतकी गाजली, की पुढे “गोल्डीलोक्स” हा जणूकाही ‘’मध्यममार्ग” याशब्दाचा पर्यायी किंवा समानार्थी शब्द बनला ! प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी ही संकल्पना वापरून, जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी किंवा पाणी द्रवरुपात एखाद्या ग्रहावर असण्यासाठी त्या ग्रहाचे (त्याच्या) सूर्यापासूनचे अंतर मध्यम, जास्त दूर नाही, जास्त जवळ नाही – असे असावे लागते, हे सांगताना त्या अंतरासाठी “गोल्डीलोक्स अंतर” असा शब्दप्रयोग केला आहे ! असो. या पार्श्वभूमीवर, चेतन भगत आपल्या लेखाचे शीर्षक : “भारतीय राजकारणात गोल्डीलोक्स क्षण आला आहे का?” असे देतात !

यावेळचे लोकसभा निवडणुकीचे निकाल खरोखरच अजब म्हणावेत असे आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एक प्रकारे संतुष्ट व्हावे, राहावे, असे हे निकाल आहेत. भाजप आणि एन डी ए संतुष्ट, कारण त्यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी कौल दिला. कॉंग्रेस आणि इंडिया आघाडी संतुष्ट, कारण त्यांची स्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली. बऱ्यापैकी स्थिर सरकार आणि त्याचवेळी बऱ्यापैकी सशक्त विरोधी पक्ष. खरेच आपण आदर्श मध्यम स्थिती – “गोल्डीलोक्स स्थिती” गाठली आहे, की त्यात आणखी काही सुधारणा अपेक्षित आहे ?

कारण, देशात अशी “मध्यममार्गी” स्थिती स्थिर होण्यासाठी नुसते खासदारांचे संख्याबळ तसे असणे, एव्हढे पुरेसे नाही. येणारी पाच वर्षे देशासाठी खरोखरच हिताची, विकासाची ठरण्यासाठी संख्याबळाबरोबरच सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांनी संयम व काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. कोणती आहेत ही पथ्ये ?

भाजप आणि एन डी ए आघाडी ही सत्तेत असल्याने अर्थातच त्यांची जबाबदारी अधिक असणार आहे. सत्ताधारी आघाडीने यापुढे लक्षात घेण्याच्या काही गोष्टी : या आधीच्या मनमोहनसिंग यांच्या दोन कार्यकाळामध्ये (२००४ ते २०१४) निर्णय घेण्यात होणारा बराच विलंब आणि एकूणच धीमा, संथ कारभार ही न आवडणारी वैशिष्ट्ये राहिली. त्याच्या तुलनेत मोदी यांच्या दोन कार्यकाळात वेगवान निर्णय प्रक्रिया आणि खंबीर, गतिमान नेतृत्व, तडफदार धाडसी निर्णय, हे आकर्षण राहिले. पण आता, बदललेल्या परिस्थितीत कुठलाही निर्णय घेताना, पुरेसे एकमत / सर्वानुमत हे आवश्यक राहील. आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून निर्णय प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत थोडी धीमी / संथ होऊ शकते. काही मोठे धडाकेबाज निर्णय थोडे लांबणीवर पडू शकतील. निर्णय थोड्या उशिराने, कमी वेगाने झाला तरी चालेल; पण जे करू, ते पुरेशा सर्वसंमतीनेच करू, हे ठरवावे लागेल. मोठी महत्त्वाकांक्षी घोषणा करून मागाहून अपयश पदरी येण्यापेक्षा “संथ पण सर्वसंमतीने” हेच धोरण बरे.

ईंडी आघाडी (विरोधक) हे नेहमीच सत्ताधाऱ्यांना उकसवून, कोणत्याही बाबतीत अशी विधाने करायला भाग पाडण्याचा प्रयत्न करतील, की पुढे ज्याचा विपर्यास करून टीकेची झोड उठवता येईल. विरोधकांच्या अशा प्रलोभनांना बळी न पडण्याची दक्षता घ्यावी लागेल. जनतेने तुम्हाला सत्ता राबवण्यासाठी कौल दिला आहे. विरोधकांशी सतत शाब्दिक लढाया लढण्यासाठी नव्हे, हे लक्षात घ्यावे लागेल.

आपले नेमके कुठे चुकतेय ? नव्या पिढीच्या तरूण मतदारांपासून आपण दूर तर जात नाही ना ?, मतदारांचा एक मोठा वर्ग आपल्यापासून का दुरावत चालला आहे ? – नेतृत्वाच्या जवळ, सभोवती असणारे लोक हे तथ्याधारित टीका करणारे आहेत की केवळ तोंडपुजे ? याचे सखोल आत्मचिंतन करावे लागेल.

भाजप चा आदर्शवाद, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्यातील बऱ्याचशा – कलम ३७० रद्द करणे, भव्य श्रीराम मंदिर उभारणी, नागरिकत्व सुधारणा कायदा CAA, गेल्या दोन कार्यकाळांत केल्या गेल्या आहेत. किंबहुना म्हणूनच त्यांचा मूळ पाया भक्कम आहे. त्यांचा परिघावरचा ५ ते १० % मतदार हा केवळ ह्या आदर्शवादाने आकर्षित नसून, त्याच्यासाठी आर्थिक विकास, सुप्रशासन, नोकऱ्या, महागाई नियंत्रण, इत्यादीही महत्वाचे असते. स्वतःला केवळ आदर्शवादाशी जखडून घेतल्यास अडवाणी युगाकडे परत (मागे ?) जाण्याची वेळ येऊ शकते, आणि त्याने निवडणुका जिंकता येत नाहीत, याचे भान राखावे लागेल. ह्या तिसऱ्या कार्यकाळात भाजपला अशा योजना राबवाव्या लागतील, ज्या बव्हंशी सर्वाना मान्य होण्यासारख्या (Non-controversial) असतील; जसे की – तीर्थक्षेत्र पर्यटन विकास, मोठ्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण, नवी तीर्थक्षेत्रे शोधून त्यांचा पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वारसास्थळे म्हणून विकास, इत्यादी. सत्ताधारी आघाडीला ह्या गोष्टी सांगून झाल्यावर चेतन भगत विरोधकांकडे वळतात.

कॉंग्रेस व इंडी आघाडीचीही ही येती पाच वर्षे अधिक सकारात्मक, देशहिताची होतील, हे बघण्यात महत्वाची भूमिका राहील. यासाठी त्यांनी, विरोधकांनी ह्या तीन गोष्टींकडे लक्ष द्यावे : खरे सांगायचे तर कॉंग्रेस व इंडी आघाडी यांनी हे नशीबच समजावे, की ते सत्तेत आले नाहीत ! आघाडीने पूर्वीपेक्षा चांगले यश जरी मिळवले असले, तरी त्यांना मनात खोलवर कुठेतरी ही जाणीव निश्चित होती, की ते अजूनही सत्तेत येण्यासाठी तितकेसे तयार नाहीत ! उदाहरणार्थ, त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा कुठे आहे ? गृह, परराष्ट्र, संरक्षण, अर्थ – अशा महत्वाच्या खात्यांचा विचार केल्यास त्यांचे सरकार कसे असेल ? आघाडीने या सर्व गोष्टींचा पुढच्या निवडणुकांपर्यंत गांभीर्याने विचार करून ठेवावा.

आता पूर्वीपेक्षा अधिक संख्याबळ हाताशी असल्याने, विरोधी आघाडीतील पक्षांना उठसूट लहानसहान गोष्टींवरून सरकारवर टीका करण्याचा, त्यांना कोंडीत पकडण्याचा किंवा कदाचित सरकार अस्थिर करण्याचाही मोह पडू शकतो. इथे सावधगिरी बाळगावी लागेल. विरोधकांचे काम सरकारला उत्तरदायित्वाची (Accountability) सतत आठवण करून देणे हे आहे, त्याला अस्थिर करणे, किंवा होत असलेल्या कामांत सतत अडथळे आणणे हे नव्हे. जर विरोधक असे काही करताना दिसले, तर जनमानसात त्यांची विश्वासार्हता पुन्हा कमी होऊ शकेल.

हे ही वाचा:

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

इथून पुढे वाटचाल कशी राहील ?

भाजप हा नक्कीच आपला दुरावलेला मतदार पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागेल. कॉंग्रेसचे काय ? कॉंग्रेस / इंडी आघाडी तसे, तितके प्रयत्न करू शकतील ? की मिळालेल्या यशाने आत्मसंतुष्ट होतील ? तसे झाल्यास ती मोठीच चूक ठरेल. निवडणुकीच्या निकालांतून आपण हेच तर शिकलो आहोत, की भारतीय मतदाराला कोणी कधीही गृहीत धरू नये.

जनतेने दिलेला कौल, हा प्रत्यक्ष जनहितार्थ काम व्हावे, दिसावे, यासाठी असतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत नाट्यमय संघर्ष, सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न – हे बघण्यात जनसामान्यांना रस नसतो. कदाचित प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे यांना तो असेल. असो. पण भारतीय राजकारणात आपल्या सुदैवाने असा कालखंड आलाय, की ज्यामध्ये अगदी आदर्श नाही, तरी बरीचशी आदर्शाच्या जवळ पोचणारी ती (गोल्डीलोक्स) मध्यम स्थिती आहे, जिथे सक्षम, स्थिर सरकार आहे आणि पुरेसे संख्याबळ असलेला विरोधी पक्षही आहे. आता ह्याचे रुपांतर आपण एखाद्या सतत चालणाऱ्या मुष्टियुद्धाच्या सामन्यात करतो, की ह्या गोल्डीलोक्स संसदेचा उपयोग अधिकाधिक जनहिताची कामे करून घेण्यासाठी करतो, हे पहावे लागेल. यासाठी निर्णय घेण्यातील धाडसी निश्चयात्मकता आणि सर्वानुमती यामध्ये संतुलन महत्वाचे ठरेल.

श्रीकांत पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा