आघाडीची फळी कोलमडल्यामुळे पराभव, हार्दिक पांड्याची टीका!

मुंबईचा लखनऊकडून पराभव

आघाडीची फळी कोलमडल्यामुळे पराभव, हार्दिक पांड्याची टीका!

मुंबईने यंदाच्या आयपीएल हंगामात सातव्या पराभवाची नोंद केली. यावेळी त्यांना पराभूत करणारा संघ होता, केएल राहुलचा लखनऊ. सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे पराभव झाल्याचे मत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याने व्यक्त केले.

केएल राहुलने मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिल्यानंतर पॉवरप्लेमध्येच मुंबईची अवस्था चार बाद २८ अशी झाली होती. लखनऊचे मोहसीन खान, मार्कस स्टोइनिस आणि नवीन उल हक यांनी सुरुवातीलाच संघाला भगदाड पाडले. रोहित शर्मा (४), सूर्यकुमार यादव (१०), तिलक वर्मा (७) स्वस्तात आटपले आणि हार्दिकला स्वतःला भोपळाही फोडता आला नाही.

इशान किशनच्या ३२, नेहल वढेराच्या ४६ आणि टिम डेव्हिडच्या ३५ धावांमुळे मुंबईने कशीबशी तीनअंकी संख्या काढली. झटपट विकेट गेल्यामुळे कोसळलेला मुंबईचा संघ नंतर उभारीच घेऊ शकला नाही. ‘पॉवरप्लेमध्ये सुरुवातीच्या विकेट गमावून त्यातून पुन्हा सावरणे हे खरोखर कठीण असते. जेव्हा आम्हाला खरोखर चांगल्या कामगिरीची गरज होती, तेव्हा आम्ही ती केली नाही,’ असे हार्दिकने सामना संपल्यानंतर सांगितले.

हे ही वाचा:

भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक

दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन

ठाण्यात महायुतीकडून नरेश म्ह्स्केंना लोकसभेचे तिकीट

खूप मोठी धावसंख्या असली की आघाडीच्या फलंदाजांवर दडपण येते का, असे विचारले असता, त्याने नाही असे उत्तर दिले. ‘नाही. तुम्हाला चेंडू बघून तो मारावाच लागतो. खेळपट्टी चांगली होती. चेंडू चांगला उसळी घेत होता. मात्र आम्ही ती संधी फुकट घालवली,’ अशी कबुली त्याने दिली. ‘तुम्ही कधी चांगली कामगिरी करता तेव्हा तुम्हाला लढावेच लागते. या खेळातून शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी होत्या,’ असेही हार्दिक म्हणाला.

मुंबईची फलंदाजांची फळी कोसळली असताना वढेरा लखनऊच्या गोलंदाजांसमोर नेटाने उभा राहिला. त्याने ४१ चेंडूंत ४६ धावा केल्या. ‘त्याने उत्तम कामगिरी बजावली. त्याने राजस्थान आणि आज ज्या प्रमाणे फलंदाजी केली, त्याला तोड नव्हती. त्याने गेल्या वर्षीही चांगली कामगिरी केली. संघाच्या काही विशिष्ट नियोजनामुळे त्याला सुरुवातीला खेळायला पाठवणे शक्य झाले नाही. त्याच्यातील गुणवत्ता पाहता, तो पुढील अनेक वर्षे मुंबई आणि देशासाठी खेळू शकेल,’ असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला. १० सामन्यांतील सात सामन्यांत पराभव झाल्यामुळे मुंबईची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. तर, मुंबईवर विजय मिळवल्यामुळे लखनऊ संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

Exit mobile version