हार्बर मार्गावर लवकरच बोरिवलीपर्यंत धावणार लोकल

प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला

हार्बर मार्गावर लवकरच बोरिवलीपर्यंत धावणार लोकल

सध्या मुंबईतील हार्बर लोकल गोरेगावपर्यंत चालवली जात आहे. लवकरच या सेवेचा विस्तार करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि वृक्ष सर्वेक्षणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आता हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा बोरिवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव दरम्यान लोकल धावतात. गोरेगाव पनवेल लोकल सेवाही सध्या सुरू आहे. यापूर्वी गोरेगावऐवजी हार्बर लोकल अंधेरीपर्यंत धावत होती. तसेच प्रवासी अंधेरीहून पश्चिम रेल्वेच्या लोकलने प्रवास करत होते. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही सेवा गोरेगावपर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्च २०१९ पासून गोरेगावपर्यंत लोकल धावण्यास सुरुवात झाली. आता हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्ताराचे काम पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे.

हार्बर मार्गावर गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानचा ७.८ किलोमीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८२५ कोटी ३१ लाख रुपये आहे.२०३१ पर्यंत प्रवाशांच्या संख्येत २ ते ३ लाखांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही तयार होणार आहे. भविष्यात बोरिवलीपर्यंत ८ मार्ग असतील.

हे ही वाचा :

काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली

७.८ किलोमीटर पैकी ३ किलोमीटरचा मालाड येथील भाग उन्नत असेल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कॉरिडॉरच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. २०१९ मध्ये, रेल्वे बोर्डाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-३ साठी अंदाजे ८२६ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु कोरोना महामारीमुळे प्रकल्पाला २०२१ पर्यंत विलंब झाला. प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरुवातीला डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. अंधेरीपर्यंत असलेली हार्बर लोकल सेवा एप्रिल २०१८ मध्ये गोरेगावपर्यंत वाढविण्यात आली. बोरिवलीपर्यंतचा मार्ग विस्तारल्यानंतर मालाड आणि बोरिवली स्थानकांदरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. या प्रवाशांना सध्या पनवेल किंवा सीएसएमटीला जाण्यासाठी गाड्या बदलाव्या लागतात.

Exit mobile version