टी २० विश्वचषक २०२४स्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक लढतीत विजय मिळवला. या सामन्यात शेवटचे षटक भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंह याने टाकले. त्याने केवळ ११ धावा देऊन भारताला विजय मिळवून दिला. मात्र या २५ वर्षीय गोलंदाजाबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने वादग्रस्त विधान केले. त्याने शीख समुदायाबद्दल अनुदार उद्गार काढल्यामुळे वाद निर्माण झाला असून हरभजन सिंगनेही त्याला फटकारले आहे. अखेर विधान अंगलट आल्यानंतर अकमलने माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर कामरान अकमलचे हे वादग्रस्त विधान व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि शाहिद हाशमी अर्शदीपसिंगची टर उडवत असल्याचे दिसत आहे. मात्र जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या कामगिरीतून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानला २०व्या षटकांत विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. कामरान अकमल आणि शाहिद हाश्मी यांनी त्याचवेळी वादग्रस्त वक्तव्य केले. अर्शदीपला २०वे षटक दिले नसते तर पाकिस्तान विजयी झाला असता, असे बोलताना शीख समुदायाबाबत काही वादग्रस्त विधानही अकमल याने केले.
हे ही वाचा:
आस्था जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला
‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’
रेल्वे पोलीस विभागाला ४०० टक्क्याचे अमिष दाखवून निविदा केली मंजूर
बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?
त्यानंतर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने सोशल मीडियावरून अकमल याचा समाचार घेतला आणि सडेतोड उत्तर दिले. ‘तोंड उघडण्याआधी तू शीखांचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होतास. आम्ही शीखांनी तुझ्या आई-बहिणांना घुसखोरांपासून वाचवले. तुला लाज वाटली पाहिजे,’ अशा शब्दांत हरभजन सिंग यांनी अकमल याचा समाचार घेतला. त्यानंतर अकमल याने आपल्या विधानाबाबत ट्वीट करून माफी मागितली. भारताचा हा पाकिस्तानवर सातवा आणि एकदिवसीय व टी २० विश्वचषक स्पर्धा मिळून १६ सामन्यांमधील १५वा विजय आहे.