‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र सरकारकडून विविध उपक्रम आणि मोहिमा राबवल्या जात आहेत. ७५ दिवस मोफत बुस्टर डोसची घोषणा नुकतीच केली होती त्यानंतर आता देशभरात ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबई महानगरात देखील हा उपक्रम राबवला जाणार असून त्यादृष्टीने प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना नेमून दिलेली कार्यवाही करावी, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशभरात ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावर कार्यान्वयन समिती नेमण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक नागरिकाच्या घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

बनावट व्हॉटसॲप डीपीच्या आधारे लाखोंचा गंडा

रियाला कुणीतरी जाणून बुजून सुशांतच्या आयुष्यात पाठवले; प्रियांका सिंगचा आरोप

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

पंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!

हा संपूर्ण उपक्रम राबवितांना भारतीय ध्वजसंहिता २००२ नुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी केले आहे. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भाग म्हणून दिनांक ९ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम देखील जनसहभागातून राबवण्यात यावेत, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिले आहेत.

Exit mobile version