संपूर्ण देशभरात आज, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. रस्ते, चौक आणि प्रशासकीय इमारती विद्युत रोषणाई आणि तिरंग्याने सजलेले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवारांचेही त्यांनी अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं आहे का, “देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद! तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही त्यांनी अभिनंदन केले आहे. “पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा आदर करतो. ते त्यांच्या असामान्य कार्याने लोकांना प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा.”
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा हा दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होणार आहे. नुकतीच त्यांनी हुतात्मा झालेल्या वीरांना देशवासियांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घेण्यासाठी कर्तव्यपथावर पोहचणार आहेत.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!
मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!
मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!
यंदाच्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ९५ सदस्यीय मार्चिंग तुकडी आणि फ्रान्समधील ३३ सदस्यीय बँड तुकडीही या परेडमध्ये सहभागी होणार आहे. फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांसह, एक मल्टी-रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होतील. याशिवाय काही राज्यांचे चित्ररथही या संचलनात असणार आहेत.