गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आणि आपल्या आवाजाने साऱ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. लतादीदींनी आज आपल्या वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली अनेक दशके आपल्या आवाजातून संगीतप्रेमींच्या हृदयावर छाप सोडणाऱ्या लता दीदींवर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
लता मंगेशकर हे केवळ एक नाव नसून ते भारतीय संगीत क्षेत्रातील एक पर्व आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १९३० साली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सुरू झालेला लता दीदींचा संगीत प्रवास हा आजपर्यंत अविरत सुरु आहे. लतादीदींनी आजवर विविध भाषांमधून हजारो गाणी गायलेली आहेत, जी ऐकून कोट्यावधी रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. तर या सोबतच लता दीदींनी अनेक गाणीही स्वतः संगीतबद्ध केली आहेत. ‘आनंदघन’ या नावाने त्या संगीतकार म्हणून कार्यरत होत्या.
लता दीदींना त्यांच्या या संगीत सेवेसाठी रसिकांकडून तर भरभरून प्रेम मिळालेच पण विविध पातळीवरून त्यांच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. महाराष्ट्र भूषण, भारतरत्न, फ्रान्स सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
भारत-तैवानमधील ‘हा’ करार वाढवतोय चीनची चिंता
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
लता दीदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत असे म्हटले आहे की, “आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधुर आवाज जगभर गाजतो. त्यांची विनम्रता आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेली त्यांची उत्कटता याबद्दल त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद महान शक्तीचा स्रोत आहे. मी लता दीदींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो.”
तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी लता दीदींना साधेपणा आणि सौम्यतेचे प्रतीक म्हटले आहे. ते म्हणतात “लता दीदींनी आपल्या सुमधुर आवाजाने भारतीय संगीत जगभर गाजवले आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही नेहमी निरोगी असाल आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.”