७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या नृशंस हल्ल्याप्रकरणी हमासच्या दहशतवाद्यांनी ‘गरिबांचे कोकेन’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘कॅप्टॅगॉन’ अमली पदार्थांचे सेवन केल्याचे वृत्त ‘जेरुसलेम पोस्ट’ या वृत्तपत्राने दिले आहे.
कॅप्टॅगॉन हे एक कृत्रिम ऍम्फेटामाइन-प्रकाराचे उत्तेजक आहे. इस्रायलमध्ये मारले गेलेल्या अनेक हमास दहशतवाद्यांच्या खिशातून कॅप्टॅगॉनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या, असे वृत्त ‘जेरुसलेम पोस्ट’ने दिले आहे. या अमली पदार्थांच्या नशेत असल्यामुळेच ते थंड डोक्याने हे अमानुष हल्ले करू शकले. शिवाय, या गोळ्यांनी त्यांना दीर्घ काळासाठी अत्यंत जागरुक ठेवले आणि त्यांची भूक कमी केली. इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी दहशतवादी कारवाया करण्यापूर्वी त्यांच्यातील भीती दूर करण्यासाठी कॅप्टॅगॉनचा वापर केल्याचे आढळून आल्यानंतर २०१५मध्ये याला प्रसिद्धी मिळाली.
गेल्या काही वर्षांमध्ये, जसजसा इस्लामिक स्टेटचा प्रभाव कमी होत गेला, तसतसे या अमली पदार्थांच्या तस्करीत सीरिया आणि लेबनॉनने नियंत्रण मिळवले आणि मोठ्या प्रमाणावर औषधाचे उत्पादन व वितरण सुरू केले. गाझा, विशेषतः येथील तरुण हे कॅप्टॅगॉनसाठी एक लोकप्रिय बाजारपेठ बनले आहे. कॅप्टॅगॉन हे ‘अॅम्फेटामाइन’ या प्रकाराशी संबंधित आहे. नैराश्य, नार्कोलेप्सी या विकारांवर उपचार म्हणून हे विकसित करण्यात आले होते. व्यसनाचा अंमल तीव्रतेने होणे, तसेच, मनोविकारात्मक प्रतिक्रिया प्रवृत्त करण्याची क्षमता अशी कॅप्टॅगॉनची वैशिष्ट्ये आहेत. तसेच, परवडण्याजोगी किंमत आणि उत्पादन सुलभतेमुळे मध्य पूर्वेमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. हे औषध गरीब देशांमध्ये अवघ्या एक किंवा दोन अमेरिकी डॉलरमध्ये विकत घेतले जाऊ शकते, तर श्रीमंत राष्ट्रांमध्ये, त्याची किंमत प्रति गोळी २० अमेरिकी डॉलरपर्यंत असू शकते.
कॅप्टॅगॉनचे सेवन केल्यानंतर जाणवणारे मुख्य परिणाम म्हणजे आनंदाची भावना जागृत होणे, तसेच, झोपेची गरज कमी होणे, भूक कमी लागणे आणि बऱ्याच काळापर्यंत टिकणारी ऊर्जा मिळणे.सीरिया आणि लेबनॉनमधील वैद्यकीय व्यावसायिकांच्या मते, हे अमली पदार्थ केवळ लढवय्यांमध्येच प्रचलित आहेत असे नाही, तर युद्धक्षेत्रात राहणारे हताश नागरिकही हे वारंवार वापरतात. हा अमली पदार्थ सीरियासाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत बनला आहे आणि इराण समर्थित लेबनॉन गट हिजबुल्लाह सक्रियपणे याला पाठिंबा देतात.जवळपास दोन वर्षांपूर्वी, न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, सीरियाच्या हुकूमशहाशी संबंधित असलेले बशर असद यांनी कुटुंबीयांसह कॅप्टॅगॉनच्या निर्मितीसाठी भरभराटीचा उद्योग स्थापन केला होता.
हे ही वाचा:
गडकिल्ल्यांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे
ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान
‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!
‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’
हिजबुल्लाहच्या सहभागाभोवती फिरणारा, हा उद्योग असदच्या भावाच्या देखरेखीखाली आहे आणि दहा वर्षांहून अधिक काळ सीरियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामध्येही एक समृद्ध उद्योग म्हणून काम करतो. या अमली पदार्थांनी सौदी अरेबियाच्या पलीकडेही मजल मारली आहे. कॅप्टॅगॉन इटली, मलेशिया, ग्रीस आणि इजिप्तमध्येही पोहोचला आहे. जॉर्डनमध्ये तर हा अमली पदार्थ कमी किमतीत सहज उपलब्ध आहे. तिथे तर शाळेत जाणाऱ्या मुलांसह वंचित तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता अधिक आहे.
कुवेतच्या अधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये संत्र्यांच्या शिपमेंटमध्ये लपवलेल्या ९० लाख कॅप्टॅगॉन गोळ्या जप्त केल्या होत्या. त्याच्या फक्त एक आठवडा आधी, दुबईच्या अधिकार्यांनी लिंबाच्या मालामध्ये लपलेल्या सुमारे ३८ कोटी अमेरिकी डॉलर किमतीच्या १.५ टन ड्रग गोळ्यांची तस्करी रोखली. गेल्या वर्षी २५ कोटी कॅप्टॅगॉन गोळ्यांची तस्करी होण्यापासून रोखली गेली. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही १८पट वाढ आहे. हे आकडे केवळ जप्त केलेल्या अमली पदार्थांचे आहेत. म्हणजेच वास्तवात होणाऱ्या तस्करीचे प्रमाण कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे. इस्रायललाही कॅप्टॅगॉन पुरवले जाते, असा दावा केला जातो. ही एक गोळी तिथे जवळपास ५०एनआयएस या इस्रायली चलनात मिळते.