हमासकडून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!

वृत्तसंस्था, तेल अविव

हमासकडून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!

हमासने गाझा पट्टीमध्ये ओलिस ठेवलेल्या दोन इस्रायली नागरिकांची सोमवारी सुटका केली. या दोघींची मानवतावादी दृष्टिकोनातून सुटका करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.‘मानवतावादी दृष्टिकोन आणि त्यांची प्रकृतीकडे पाहून आम्ही त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शत्रूगटाने गेल्या शुक्रवारी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला,’ असा दावा हमासने निवेदनात केला आहे.

या दोन इस्रायली नागरिकांचे नाव नुरित कूपर (७९) आणि योशेदेव लिफशिट्स (८५) असे आहे. या दोन महिला आणि त्यांच्या पतींचे त्यांच्या गाझा पट्टीनजीक असणाऱ्या निर ओझच्या किब्बुत्झ येथील घरातून अपहरण करण्यात आले होते. या दोन महिलांची सुटका करण्यात आली असली तरी त्यांच्या पतींना अजूनही हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. याबाबत इस्रायलकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय समितीने ओलिसांच्या या सुटकेचे स्वागत केले आहे. ‘या दोघींना संध्याकाळपर्यंत गाझाच्या बाहेर आणले जाईल,’ असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

११ वर्षांनंतर पुन्हा तेच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन उत्साहात

‘आमची या युद्धात निष्पक्ष मध्यस्थ म्हणून भूमिका आहे आणि भविष्यात अशा अन्य सुटका होत असतील, तर आम्ही आमच्या परीने सर्व ती मदत करू,’ असे रेड क्रॉस समितीने नमूद केले आहे. हे सुटका केलेले नागरिक सोमवारी इजिप्शियन राफा क्रॉसिंग येथे आले असल्याची माहिती इजिप्तच्या वृत्तसंस्थेने दिली. दोन महिलांची गाझा पट्टीमधून सुटका करण्यात इजिप्त सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ला केल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी एक अमेरिकी महिला आणि तिच्या मुलीची सुटका केली होती. जुडिथ आणि नताली रानन अशी या दोघींची नावे होती. इस्रायलच्या लष्कराच्या दाव्यानुसार, अद्याप २२० इस्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे.

Exit mobile version