श्री रामभक्‍तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

तयार झाला ६ हजार किलोचा महाप्रसाद

श्री रामभक्‍तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील श्री रामललाच्या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साह दिसून आला. राज्यातही दिवाळी साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून नागपूरमधील कोराडी येथील श्री जगदंबा संस्‍थानमध्‍ये राम भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसाद बनविण्यात आला. शेफ विष्‍णू मनोहर यांनी सोमवारी श्रीरामभक्‍तांसाठी हलवा बनवून विक्रम रचला.

शेफ विष्‍णू मनोहर यांनी ६ हजार क‍िलो ‘श्रीराम हलवा’ तयार करून विश्‍वविक्रम नोंदवला. या उपक्रमाला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत हलवा तयार करण्यासाठी हात भारही लावला. या महाप्रसादाचा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये श्री जगदंबा देवस्थानच्‍या नावाने नोंदवला जाणार आहे.

‘जय हनुमान’ कढईमध्‍ये भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते तूप टाकून या उपक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिऱ्यामध्ये साखर टाकून मोठ्या सराट्याने कढईतील हलवा हलवत महाप्रसाद तयार करण्‍याच्‍या प्रक्रियेत सहभाग घेतला.

‘इंड‍िया बुक’ आणि ‘एशिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’चे क्‍युरेटर डॉ. मनोज तत्‍ववादी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते शेफ विष्‍णू मनोहर यांना दोन्‍ही विश्‍वविक्रमांचे प्रमाणपत्र देण्‍यात आले. त्‍यांनी हे दोन्‍ही प्रमाणपत्र श्री जगदंबा संस्‍थानला अर्पण केले. कोराडीहून ‘जय हनुमान’ कढई क्रेनच्‍या सहायाने मोठ्या ट्रेलरवर चढवून अयोध्‍येला रवाना करण्यात आली.

हे ही वाचा:

आसाम: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर पोलिसांचा लाठीमार!

कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!

हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार

श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

अयोध्‍येत पोचायला या कढईला दोन दिवस लागतील. २६ जानेवारीनंतर तेथे सात हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्‍वविक्रम ठरणार आहे. तो श्रीराम मंदिर न्‍यासच्‍या नावे नोंदवला जाईल. त्‍यानंतर विष्‍णू मनोहर ही ‘जय हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण करणार आहेत.

Exit mobile version