‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ला (एचएल) एकूण ८३ तेजस एलसीए विमानांची ऑर्डर मिळाली आहे. ही आजवर मिळालेली सर्वात मोठी ऑर्डर आहे. या विमानाच्या दोन आवृत्त्या असून दोन्ही करता, ऑर्डर देण्यात आली आहे. १९८३ पासून निर्मीतीचे प्रयत्न चालू असलेल्या तेजस विमानास मोदी सरकारच्या काळात मूर्तरूप प्राप्त झाले. तेजसचे काम पूर्ण झाल्यानंतर, मूळ तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने आता पुढच्या विमानांच्या निर्मीतीला सुरूवात केली जाऊ शकते असे त्यांच्या अधिकाऱ्यांकडून समजले आहे.
नव्या विमानांपैकी दोन विमाने हवाई दलासाठी तर एक विमान नौदलासाठी तयार करण्यात येणार आहे. ही दोन्ही विमाने २०२६ पर्यंत कार्यरत होणे अपेक्षित आहे. इंडियन एक्सप्रेसला एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे प्रमुख गिरीश देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२३ पर्यंत हवाई दलासाठीचे विमान तयार होईल. ती या तेजस विमानाचीच अद्ययावत आवृत्ती असणार आहे. लवकरच हवाई दल मिग-२१ निवृत्त करणार आहे. त्याच्या जागी हे नवे विमान वापरले जाईल. सुमारे साडेतीन टन वजन उचलून उड्डाण करू शकणारे तेजस, हलके, वेगवान आहे. मुख्यतः आपल्या सीमांच्या संरक्षणासाठी या विमानाच वापर केला जातो. यासोबतच मिराज-२०००ला निवृत्त करण्यासाठी देखील नवे विमान बनवण्यात येणार आहे. या विमानाच्या बदली येणाऱ्या नव्या विमानाची वहनक्षमता अधिक आहे. वहनक्षमता वेगवेगळी असली तरी दोन्ही विमानांची इंजिन भारतीय बनावटीची आहेत आणि केवळ एक इंजिन असलेली ही विमाने आहेत.
यासोबत दोन इंजिन असणारी नौकेच्या डेकवरून उड्डाण करू शकणारी विमाने देखील बनवण्याचे आव्हान एचएएलसोबत आहेत. मात्र ही विमाने २०२६ पर्यंत कार्यरत होणे अपेक्षित आहे. विमानवाहू नौकेवरून उड्डाणे-उतरण्याच्या विविध चाचण्या झाल्यानंतर २०३१ पर्यंत ही विमाने रूजू करुन घेण्याचा नौदलाचा मानस आहे.