उत्तर प्रदेश येथील ज्ञानवापी मशिदीच्या खटल्याबाबत आज, १२ सप्टेंबर रोजी वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालय निकाल देणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सुनावणीपूर्वी वाराणसीत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशिदीचा वाद समोर आला होता. दरम्यान वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी याचिका हिंदू समाजाच्या बाजूने करण्यात आली होती. ही याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही यासंबंधी वाराणसीचे जिल्हा न्यायालय आज निकाल देणार आहे. या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.
दरम्यान, वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढण्याचे निर्देशही पोलिसांना आयुक्तांनी दिले आहेत. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”
पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव
राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम
ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते.