सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना

तिन्ही संरक्षणदलांची मदत, एनडीआरएफच्या ३३ तुकड्या तैनात

बिपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी गुजरात सज्ज झाले असून कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर या वादळाचा पहिला फटका बसणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी संवाद साधला असून या चक्रीवादळाच्या प्रभावाशी कसा सामना करायचा यासाठी तिन्ही संरक्षण दले कशी सज्ज आहेत, याचा आढावा त्यांनी घेतला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तिन्ही दले पूर्णपणे तयारीत आहेत असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.

 

राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची ३३ पथके गुजरात तसेच महाराष्ट्रात नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या या ३३ पैकी १८ पथके ही गुजरातमध्ये तैनात करण्यात आली असून त्यातील ४ पथके ही कच्छमध्ये असतील. राजकोट तसेच देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी तीन पथके आहेत. जामनगरमध्ये दोन पथके ठेवण्यात आली असून पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगर येथे प्रत्येकी एक एनडीआरएफ पथक असेल.

 

दिवमध्येही एक पथक ठेवण्यात आले आहे. १४ पथकांपैकी महाराष्ट्रात ५ पथके मुंबईत तैनात आहेत तर इतर राखीव ठेवण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात ३५ ते ४० जवानांचा समावेश आहे. त्यांच्याकडे सर्वप्रकारची अत्याधुनिक सामुग्रीही आहे. प्राथमिक आरोग्य उपचारासाठीची औषधे, लोकांसाठी आवश्यक असलेले अन्नपदार्थही त्यांच्या सोबत आहेत. पोरबंदर येथे वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुजरातमधील मासेमारी पूर्णपणे बंद करण्यात आली असून १६ जून पर्यंत ती बंद असेल असा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ५० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कुस्ती महासंघाच्या निवडणूक निकालाचे चित्र ६ जुलैला होणार स्पष्ट

बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणातील दोघे निर्दोष

मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश देणारे आणखी दोन वैमानिक सापडले; एअर इंडियाने केले निलंबित

‘लिव्ह-इन रिलेशनशिपला विवाह म्हणून कायद्याची मान्यता नाही’

 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाचा आपला दौरा रद्द केला असून ते गुजरातमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेलंगणाच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे की, चक्रीवादळाचा गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानला बसणारा फटका लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाचा दौरा रद्द केला आहे.

 

या चक्रीवादळाचा प्रभाव गुरुवारी संध्याकाळपासून दिसू लागणार आहे. विशेष म्हणजे आताही पावसाला सुरुवात झालेली आहे. १५ जूनला प्रत्यक्ष हे वादळ जेव्हा गुजरातच्या किनाऱ्यावर धडकेल तेव्हा प्रचंड पाऊस कोसळणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर येथे सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, या वादळाचा प्रभाव भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. जवळपास ताशी १३५ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकणार आहे. पाकिस्तानातील समुद्रकिनाऱ्यांवरही उंच उंच सागरी लाटा धडकू लागल्या आहेत. मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथे वादळाचा प्रभाव जाणवत आहे.

Exit mobile version