भारतीय अर्थव्यवस्था कोरोना महामारीतून उठून धावण्याच्या तयारीत असतानाच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)ने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताची उर्जेची गरज पुढील दोन दशकांत जगात सर्वाधिक वेगाने वाढेल असे भाकित केले आहे.
भारताने गेल्या काही वर्षात अनेक घरांना विद्युत जोडणी देऊन, पुनर्वापरायोग्य उर्जेचा अधिकाधीक वापर करून, त्यातही विशेषत्त्वाने सौर उर्जेवर भर देऊन उर्जा क्षेत्रात जोरदार कामगिरी केली आहे असे आयईएचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले. भारताला कार्बन आधारित उर्जेशिवाय आपली गरज पुर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.
‘द इंडिया एनर्जी आऊटलूक २०२१’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आल्या प्रमाणे भारतातील सौर उर्जेचा वाढता वापर आणि त्यासाठी प्रोत्साहन देणारी राजकिय धोरणे यामुळे देशातील घरे, उद्योग यांना हरित उर्जेचा विश्वसनीय पुरवठा करणे शक्य आहे.
हरित उर्जेसाठी सध्या केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या अंदाजापेक्षा ७० टक्के अधिक गुंतवणुक करण्याची गरज पडू शकते. त्याबरोबरच देशाच्या खनिज तेलाच्या आयात खर्चावर सध्यापेक्षा तिप्पट खर्च होईल असेही या अहवालात सांगितले आहे. देशांतर्गत तेलाचे उत्पादन घटल्याने आयात केल्या जाणाऱ्या तेलावरचे अवलंबित्व सध्याच्या ७५ टक्क्यांवरून वाढून ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
मात्र बिरोल यांच्याच मते जगासाठीचे हरित उर्जेचे सर्व मार्ग हे भारतातूनच जातात.