चंदीगड शहरातील उच्च दर्जाच्या सेक्टर १० भागात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोट घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित फरार असून पोलिसांनी पकडण्यासाठी त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोटाची घटना बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता घडली, या स्फोटाच्या प्रभावामुळे खिडक्या आणि फुलांच्या भांडींचे नुकसान झाले, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, स्फोटाच्या काही वेळापूर्वी तीन लोक ऑटोरिक्षातून घटनास्थळी आले होते. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दुरूनही ऐकू आला. स्फोट झाल्याचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये, एक ऑटोरिक्षा वेगाने जाताना दिसत आहे.
हे ही वाचा :
कर्नाटक: गणपती मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी ५२ जणांच्या आवळल्या मुसक्या
कर्नाटकच्या मंड्यामध्ये दर्ग्याजवळून जात असलेल्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक
आरजी कर रुग्णालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याच्या घरावर ईडीकडून छापेमारी
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चंदीगड पोलिसांनी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) च्या फॉरेन्सिक तज्ज्ञांसह घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करण्यास आणि स्फोटकाचे स्वरूप तपासण्यास सुरुवात केली. स्फोटाच्या ठिकाणाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संशयित हल्लेखोरांचे फोटो टिपण्यात आले आहेत. संशयित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. दरम्यान, देशाबाहेरून कार्यरत असलेल्या एका गटाचा यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.