मुंबई शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच ते थेट समुद्रात सोडण्याचा प्रकार महापालिकेने केलेला आहे. त्यामुळेच आता हरित लवादाकडून महापालिकेची चांगलीच कानउघाडणी करण्यात आलेली आहे. तसेच दंडाची रक्कमही आता पालिकेला भरावी लागणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता पालिकेला तब्बल २ कोटी १० लाखांचा दंडच ठोठावला आहे. तसेच हा दंड तातडीने भरण्याची तंबी आता पालिकेला दिलेली आहे. त्यामुळेच पालिकेचा अजागळ कारभारावर किमान चाप बसेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हरित लवादाच्या म्हणण्यानुसार मुंबईतील ८५ ठिकाणी पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे आता समोर आलेले आहे. तसेच हरित लवादाकडून याआधीही पालिकेला ३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे टक्केवारीपायी पालिकेने पर्यावरणाचा खेळखंडोबा करून ठेवलेला आहे.
हे ही वाचा:
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही
भांडुप, घाटकोपर, वर्सोवा, मालाड, कुलाबा, वरळी आणि वांद्रे मिळून सात मल उदंचन केंद्रे आहेत. परंतु ही सर्व यंत्रणा १७ वर्षे जूनी आहे. शहरातील सांडपाणी १८६ ठिकाणांहून समुद्रात सोडले जाते. मात्र ८५ मोठ्या ठिकाणांवर सोडण्यात येणारे प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया मात्र केली जात नाही.
याआधी शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. परंतु पालिका प्रशासन मात्र या एकूणच प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील कचरा, सांडपाणी प्रक्रिया न करताच मिठी नदीत जाते; ते त्याच स्वरूपात अरबी समुद्रात पोहोचते. त्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे असले तरी पालिका प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.