क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटचा २०२८ च्या लॉस एंजलेस ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. याबाबतची घोषणा शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. आयओसी अध्यक्ष थॉमस बेच यांनी मुंबईतील बोर्ड मिटिंगनंतर बोलताना याची माहिती दिली.
क्रिकेट सोबतच बेस बॉल, सॉफ्ट बॉल, फ्लॅग फुटबॉल लॅक्रॉसे आणि स्क्वॉश या नव्या खेळांचा देखील सामावेश करण्यात आला आहे. आता समितीने परवानगी दिली असून या सर्व नवीन खेळांच्या बाजूने आयओसी सदस्य देशांनी देखील मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी सोमवारी मतदार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व खेळांचा २०२८ च्या लॉस एंजलेस येथील ऑलिम्पिक गेम्समधील समावेश निश्चित होणार आहे.
थॉमस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “ऑलिम्पिक समितीने लॉस एंजलेस ऑलिम्पिकमध्ये पाच नव्या खेळांचा समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने तो प्रस्ताव मान्य केला आहे. यात बेसबॉल – सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लाक्रोसे, स्क्वॉश आणि क्रिकेट यांचा समावेश आहे.”
हे ही वाचा:
दिल्लीत टॅक्सीमध्येच तरुणीवर सपासप वार
भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन
एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मुद्दा हा वाडा (WADA) आणि बीसीसीआय यांच्यातील वादामुळे रखडला होता. अखेर बीसीसीआय आणि आयसीसीने २०१६ मध्ये अँटी डोपिंगची जागतिक संघटना वाडाच्या धोरणांचा स्विकार केला. आता महिला क्रिकेट देखील प्रसिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मार्ग मोकळा झाला. गेली राष्ट्रकुल स्पर्धा आणि नुकतीच झालेल्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला क्रिकेटचा समावेश होता. तर एशियन गेम्समध्ये पुरूष क्रिकेट आणि महिला क्रिकेट दोन्हीचा समावेश होता. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरूष संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे.