अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. (एईएमएल) या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत ज्या ग्राहकांना अपारंपारिक उर्जास्रोतांपासून बनवलेली वीज वापरायची असेल त्यांना तो पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र इलेक्ट्रिसीटी रेग्युलेटरी कमिशनने (एमइआरसी) घोषीत केलेल्या एका योजनेनुसार एईएमएलचे ग्राहक संपूर्ण अपारंपारिक उर्जेची मागणी करू शकतात. त्यासाठी ६६ पैसे अधिक मोजून हरित उर्जा वापरली जाऊ शकते.
हे ही वाचा:
स्वच्छ, हरित तंत्रज्ञानासाठी भारत- अमेरिका एकत्र काम करू शकतात
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना कंपनी तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कंपनीला त्यांच्या राजस्थानातील सौर आणि पवन विद्युत निर्मिती केंद्रांमधून ७०० मेगावॅट वीज २०२२-२३च्या शेवटपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच आणखी हरित उर्जा स्रोतांद्वारे कंपनी यात १,००० मेगावॅटची भर घालणार आहे.
एईएमल शाश्वतता आणि भारताच्या पॅरिस करारातील अटींच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
एईएमएल २०२३ पर्यंत त्यांच्या एकूण उर्जा गरजेपैकी ३० टक्के गरज अपारंपारिक उर्जा स्रोतांतून भागवणार आहेत. एमइआरसीला पाठवलेल्या निवेदनानुसार १००० मेगावॅट अधिक उर्जा देखील त्यांना लवकरच प्राप्त होईल, ज्यापैकी ५१ टक्के उर्जा अपारंपारिक उर्जा स्रोतांमधून घेतली जाणार आहे.
या उपक्रमाचा फायदा ज्या ग्राहकांना हरित उर्जा वापरायची आहे त्यांना होणार आहे असे देखील कंपनीद्वारे सांगण्यात आले.
अपारंपारिक उर्जा स्रोत आणि काही अप्रत्यक्ष मार्गांनी एईएमएल त्यांच्या मुंबईतील ग्राहकांना हरित उर्जेचे लक्ष्य गाठण्यास मदत करू शकेल.
कंपनीने अपारंपारिक उर्जा स्रोतांवर वीज निर्मीती केंद्रे वाढवल्याने कंपनी ग्राहकांना त्यांचा उर्जा स्रोत निवडण्याची संधी देऊ शकेल. त्यामुळे अधिकाधीक लोकांपर्यंत हरित उर्जा पोहोचू शकेल आणि हरित उर्जेत मोठे बदल घडून येतील, असे एईएमएलचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कांदर्प पटेल यांनी सांगितले.