गाणारे व्हायोलिन या नावाने प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमाचे जनक सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना रविवारी देवाज्ञा झाली. ते ८९ वर्षांचे होते.
संगीतकार, वादक, संगीत संयोजक असे वैविध्यपूर्ण काम जोग यांनी केले होते. तब्बल ६ दशकांहून अधिक काळ ते संगीतक्षेत्रात वावरत होते. वयाच्या १२व्या वर्षी ते संगीतक्षेत्रात आले. अगदी लहानपणापासून ते व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम करत असत. त्यासाठी सव्वा रुपया आणि नारळ असे मानधन घेऊन ते कार्यक्रम सादर करत. नंतर त्यांनी प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणालाही जोग यांच्या व्हायोलिनच्या सुरांची साथ लाभली होती. पराधिन आहे जगती हे गीत रामायणमधील गाण्याची त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेली धून त्यांच्या निधनानंतर आता व्हायरल झाली आहे. त्यातून त्यांचे व्हायोलिन कसे बोलत असे याची प्रचीती येत असल्याचे संगीतप्रेमींचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’
उपनगरीय रेल्वेच्या तिकीटीसाठी आता ग्रीन सिग्नल!
दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू
नवाब मलिकांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
जोग यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्कार २०१७मध्ये प्रदान करण्यात आला होता. २०१७साली गदिमा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना २०१५मध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी काही चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात कैवारी, चांदणे शिंपित जा, सतीची पुण्याई या चित्रपटांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांना सूरसिंगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या भारत गायन समाज तर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार देऊन त्यांना २०१३ मध्ये गौरविण्यात आले होते.