भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. १०० कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आवडणार नाहीच” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांनी ही संधी मला द्यावी अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. इतकंच नाही तर अजित पवारांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रिपद देऊ नये, असंही म्हटलं होतं. त्याला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा:
मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!
… म्हणून राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली
‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!
पुण्याचा उपनिरीक्षक झाला रातोरात करोडपती!
चित्रा वाघ म्हणाल्या, राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना ₹१०० कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण…ससून प्रकरणात ९ पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल कारण… हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण… कारण, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री.. तुम्हाला हवे काय ?
आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री? तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?, अशी पोस्ट ट्विटरवर शेअर करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.