लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला मोहम्मद कासिम गुजर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहणाऱ्या कासिमला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद कासिम गुजरने दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले आहेत. त्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. भारताविरुद्ध युद्धाची योजना आखण्यात त्याचा सहभाग आहे. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशाची एकता आणि अखंडतेच्या विरोधात कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
हेही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
दरम्यान, दहशतवादी घोषित करण्यात आलेला कासिम गुजर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहत आहे. २०२२ मध्ये माता वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामागे तो मुख्य सूत्रधार होता.या हल्ल्यात चार जण ठार झाले होते तर दोन डझनहून अधिक जखमी झाले होते.यापूर्वी २०२१ मध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भाजप नेत्याच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात कासिमचाही सहभाग होता, ज्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दहशतवादी कासिम गुजर मूळचा रियासी जिल्ह्यातील माहोरच्या अंगारला गावचा रहिवासी असून अनेक दशकांपासून फरार आहे.