राज्यात महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ नुकतीच जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांसाठीही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषी पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. दरम्यान, शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी टीका केली. म्हणाले की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? त्यांना सांगायचं आहे की, लाडक्या भावांकडेही सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण १२ वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, “या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील तिथे त्यांच्यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.”
हे ही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक
ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटून १३ भारतीयांसह १६ जणांचा क्रू बेपत्ता
चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न
भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी
“राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील.”