पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली, त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आणि आता भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. इब्राहिम साहिब यांची चर्चा झाल्यानंतर काही वेळातच ते येथून निघून गेले.दरम्यान, या बैठकीत काय चर्चा झाली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मालदीवच्या महिला मंत्री मरियम शियुना यांनी सोशल मीडियावर पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला होता. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे निवेदन जारी केले. मंत्र्यांच्या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, विराटचे पुनरागमन
जय श्रीराम : गडचिरोलीतील सागवानातून निर्माण होणार राममंदिराचे दरवाजे
बिलकीस बानोप्रकरणी ११ आरोपींच्या शिक्षामाफीचा निर्णय रद्द!
देशभरात २९,२७३ बनावट कंपन्या; ४४ हजार कोटींची जीएसटी चोरी
परंतु, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना तसेच मलशा शरीफ आणि महजूम मजीद यांना निलंबित केले.पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. मालदीव सरकारचे प्रवक्ते, मंत्री इब्राहिम खलील यांनी आज तकला सांगितले की, वादग्रस्त टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
हे संपूर्ण प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सुरू झाले. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच त्यांनी भारतीयांना या बेटाला भेट देण्याची योजना आखण्याचे आवाहन केले होते. यानंतर मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, या ट्विटवर टीका झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले.