जगातील सर्वात मोठे लस उत्पादक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष आदर पुनावाला यांनी लसींच्या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्र सरकारने नोंदविलेल्या २६ कोटी डोसेसपैकी १५ कोटी डोस पुरविण्यात आले आहेत तर ११ कोटी डोसेससाठी केंद्राने १७३२ कोटी रुपये आगाऊ दिले आहेत, अशी माहिती पुनावाला यांनी आपल्या पत्रकात दिली आहे. पुनावाला हे सध्या लंडनमध्ये असून त्यांना लसींचा पुरवठा करण्यावरून काही बड्या नेत्यांनी, उद्योगपतींनी आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी धमकावल्याचे प्रकरण समोर आले होते. त्याबद्दल त्यांनी आपली भूमिका या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
या पत्रकाच्या सुरूवातीलाच, लस उत्पादनाची क्षमता वाढवण्यावरून बोलणाऱ्यांना पुनावाला यांनी झापले आहे. ते म्हणतात की, लस बनवणे ही एक कौशल्यपूर्ण गोष्ट आहे आणि एका दिवसात त्याचं उत्पादन वाढवता येत नाही. भारताची लोकसंख्या देखील खूप आहे. जगातील प्रगत देश आणि सर्वोत्तम कंपन्याही कमी लोकसंख्या असलेल्या देशांना लसपुरवठा करताना अनेक संकटांचा सामना करत आहेत.
त्याबरोबरच त्यांनी केंद्र सरकारसोबत गेल्या एप्रिल महिन्यापासून काम करत असल्याचे देखील स्पष्ट केले. केंद्र सरकारने वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक सर्व तऱ्हेचा पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट करून विरोधकांना सणसणीत चपराक हाणली आहे.
हे ही वाचा:
पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला
मोदींनी केले विरोधकांचे अभिनंदन
निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक
योग्य वेळ आली की सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार
सरकारने आत्तापर्यंत २६ कोटी डोसेसची मागणी नोंदवली असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यापैकी सिरमने १५ कोटी डोसेसची मागणी पूर्ण केली आहे. त्याबरोबरच सरकारने पुढील ११ कोटी डोसेस करता १०० टक्के आगाऊ रक्कम १७३२.५० कोटी रुपये देखील अदा केल्याचे सांगितले आहे. पुढील ११ कोटी डोसेस येत्या काही महिन्यात राज्य शासनाच्या रुग्णालयांना आणि खासगी रुग्णालयांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
Amongst multiple reports it is important that correct information be shared with the public. pic.twitter.com/nzyOZwVBxH
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 3, 2021
या पत्रकाच्या अखेरीस लस सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय भारताच्या कोविड विरूद्धच्या लढ्याला बळ येण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.