राज्यभरात बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीतासाठी उभे राहा

सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग अनिवार्य

राज्यभरात बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीतासाठी उभे राहा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याच्या एका दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाची घोषणा केली आहे. हा स्वराज्य महोत्सवाचा एक भाग आहे असं ते म्हणाले. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय यांनी सरकारी ठराव जारी केला.

शासकीय ठरावानुसार शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग अनिवार्य आहे. सकाळी ११ ते ११.०१ या वेळेत सामूहिक राष्ट्रगीत गाणे अपेक्षित आहे. सामूहिक गायनादरम्यान राष्ट्रगीताचा अनादर होऊ नये यासाठी संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी, असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय खाजगी आस्थापना, व्यापारी संस्था, सरकारी व निमशासकीय कार्यालये, केंद्र व राज्य सरकारशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्याच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांनी जिथे असेल तिथे थोडा वेळ थांबून राष्ट्रगीत गावे अशी सरकारची अपेक्षा आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाने केले आहे.

हे ही वाचा:

एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही म्हणजेच निसर्गही आमच्यासोबत

दागिने विक्रेत्याने दिली होती मुकेश अंबानींना धमकी

विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी

निष्काळजी चालक आणि बेस्टला लाखोंचा भुर्दंड

 

विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडांगण, वर्ग किंवा सभागृहात एकत्र यावे, असे सरकारने म्हटले आहे.

राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाच्या प्रचारासाठी सोशल मीडिया, खासगी वाहिन्या, रेडिओ, एफएम आणि कम्युनिटी रेडिओचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे सरकारने म्हटले आहे.

Exit mobile version