महाराष्ट्रातील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सीन बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवार १५ एप्रिल रोजी मोदी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने केंद्र शासनाकडून ही मान्यता देण्यात आली आहे.
देशात सध्या कोरोनाचा आकडा वाढत आहे. बुधवारी देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आकडा हा दोन लाख पार होता. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत देशात लसीकरणाचीही आवश्यकता वाढली आहे. अशात अनेक ठिकाणी लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी ठोस पाऊले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत. केंद्र सरकारकडून आता परदेशी वॅक्सीन्सनाही मान्यता देण्यात येणार आहे. त्यातच आता भारत सरकारतर्फे महाराष्ट्रातील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सीन बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपर्यंत भारत बायोटेक ही कंपनी कोवॅक्सीन या कोरोनावरील लसीचे उत्पादन करत होती. त्यांचे हे तंत्रज्ञान आता हाफकिनला हस्तांतरित केले जाणार आहे आणि त्याधारेच हाफकीनही आता लसीचे उत्पादन करू शकणार आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवायला धावून आले मुकेश अंबानी
राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया
गुरुवारी यासंबंधीचे पत्र केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पाठवण्यात आले. तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर हाफकिनला तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून कोवॅक्सिन बनवण्याची परवानगी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच हाफकिनने लवकरात लवकर लसीचे उत्पादन सुरु करावे असे देखील म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार
केंद्र सरकारने हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. या संदर्भातले ट्विट त्यांनी केले आहे.
हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे आभार मानले
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2021