आपल्या अलौकीक आवाजाने फक्त भारतालाच नव्हे तर जगाला मोहून टाकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील. संध्याकाळी अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईत दाखल होणार आहेत.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला’
स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
‘लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे’
‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’
राष्ट्रीय दुखवटा काय असतो?
भारतरत्नाने सन्मानित एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर ती देशाची मोठी हानी मानली जाते. त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर संसद, सचिवालय, विधानसभा सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतवासांवरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो. या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम केले जात नाहीत.