मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना खालच्या स्तरावरील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी मात्र यंत्रणा पोकळ करत असल्याचा आरोप करत भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी या संपूर्ण व्यवस्थेचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी अशी मस्ती अजिबात सहन करणार नाही. मी संपूर्ण व्यवस्थेचा पर्दाफाश करीन. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न अशा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याविरोधात खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी संपूर्ण सिस्टमला एक्सपोज करण्याचा इशारा दिला आहे.
दसऱ्याला सरकारी सुट्टी असतानाही प्रशांत चौगुले नावाचा दुय्यम अभियंता मालाड येथील एसआरएच्या देवस्मृति इमारतीचे काही फ्लॅट रिकामी करण्यासाठी पोहोचला. याची माहिती मिळताच भाजप खासदार शेट्टीही तेथे पोहोचले. जेथे बेकायदेशीरपणे फ्लॅट रिकामे करण्यासाठी आलेल्या एसआरए अधिकाऱ्यांना लोकांनी ओलीस ठेवले होते. या बेकायदेशीर वसुलीमध्ये काही राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेतेही एसआरए अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सगळे संगनमत उघड करण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
भारतीय वायूसेनेने व्यापले अवघे आकाश!
अमरावती पालिकेच्या करवाढीला स्थगिती
लष्कर आता ‘हे’ भाग आयात करणार नाही
डी.वाय. चंद्रचूड होणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश
शेट्टी म्हणाले की, हे खपवून घेतले जाणार नाही. आमच्या सरकारने झोपडपट्टीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना देयकासाठी पात्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांकडून अडीच लाख रुपये शुल्क घेऊन पात्र बनवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा जीआर लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एसआरएच्या अधिकाऱ्यांनी लोकांकडून बेकायदेशीरपणे वसुली सुरू केली आहे. याच कारणामुळे दसऱ्याच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी एसआरएचे दोन अधिकारी मालाडच्या सोसायटीत पोहोचले, असे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.
अखेर एसआरए अधिकाऱ्याला लेखी माफी मागावी लागली
दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी एसआरए इमारतीतील फ्लॅट रिकामा करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याने लेखी माफी मागितली आहे. हा सगळा वाद गैरसमजातून झाला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. आणि या सर्व वादाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दुय्यम अभियंता प्रशांत चौगुले यांनी आपल्या लेखी माफीनाम्यात म्हटले आहे.