मुंबई शहर कबड्डी असो.ने गोल्फादेवी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १४ वर्षां खालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत समर्थ स्पोर्टस्, तर मुलींच्या गटात गोल्फादेवी प्रतिष्ठानने विजेतेपद पटकाविले.
अमर संदेशचा परमेश पाटील मुलांमध्ये, तर गोलफादेवी प्रतिष्ठानच्या अस्मिताराणी मंडल मुलींमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
वरळी गावातील मंडळाच्या पटांगणावर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात समर्थ स्पोर्टस् ने अमर संदेशचा प्रतिकार ५४-२९असा मोडून काढला. आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात ३२-१० अशी आघाडी घेणाऱ्या समर्थने दुसऱ्या डावात देखील त्याच त्वेषाने खेळ करीत विजय साकारला. जय बर्डेच्या चौफेर चढाया त्याला हर्ष डबरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले.
अमर संदेशचा हुकमी खेळाडू परमेश पाटीलला या सामन्यात सूर सापडला नाही. त्यांच्या नितेश पाल, कुणाल दुदम यांनी थोडाफार प्रतिकार केला. पण संघाला विजयी करण्यात तो पुरेसा नव्हता.
मुलींच्या अंतिम सामन्यात गोल्फादेवी प्रतिष्ठानने महर्षी दयानंद स्पोर्टस् चा ५७-२९ असा पाडाव करीत विजेतेपद मिळविले. पहिल्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमकतेवर भर दिल्यामुळे कबड्डी रसिकांना झटापटीचे क्षण अनुभवयास मिळाले. विश्रांतीला २५-२१ अशी नाममात्र आघाडी गोल्फादेवीकडे होती.
दुसऱ्या सत्रात मात्र टॉप गिअर टाकत गोल्फादेवीने झंजावाती खेळ करीत मोठ्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला. अस्मिताराणी मंडळाच्या तुफानी चढाया आणि आर्या पाटील, सिद्धी जंगम यांचा भक्कम बचाव यामुळे गोलफादेवीला हे शक्य झाले. महर्षी दयानंदच्या दिया घाडगे, समिक्षा सांडव, आकांक्षा मोहिते यांनी पहिल्या सत्रात कडवी लढत दिली. दुसऱ्या सत्रात मात्र त्या ढेपाळल्या.
हे ही वाचा:
काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार
सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका
नवी ‘केरळ स्टोरी’; तरुणीने मदरशात लावून घेतला गळफास
या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात समर्थने गौरीदत्त मित्तल संघाचा(७१-६५) असा, तर अमर संदेशने विजय बजरंग व्यायाम शाळेचा (६९-५८) असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलामध्ये समर्थच्या मयांक ढोणे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर विजय बजरंग व्यायाम शाळेचा विराज तिवारी उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरले. अमर संदेशचा शाश्वत देवधरे स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूचा मानकरी ठरला. मुलींमध्ये महर्षी दयानंदची दिया घाडगे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईची, तर गोल्फादेवीची आर्या पाटील उत्कृष्ट पकडीची खेळाडू ठरली. गोल्फादेवीची सई सोनावणेने स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूचा मान पटकाविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील शिंदे, मुंबई शहर कबड्डी असो.चे सचिव विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.