पत्रास कारण की…
नागरीकहो,
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर करोनाच्या या काळात अनेक असे शब्द आपल्या कानावर पडले जे प्रारंभी उच्चारणेही कठीण होते. पण नंतर आपल्याला त्यांची सवय झाली. कोरोनावर सुरुवातीच्या काळात ज्या गोळ्यांसाठी मेडिकलच्या दुकानाबाहेर रांगा लागत, त्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या. मग व्हॅक्सिनेशन, रेमडेसिवीर, आताचा म्युकरमायकोसिस आणि त्यापुढे जाऊन ग्लोबल टेंडरिंग. लसींचा तुटवडा पाहता जागतिक स्तरातून लसींची गरज भागविता येईल, या अनुषंगाने ग्लोबल टेंडरिंग या नव्या शब्दाची आता भलतीच चलती आहे. मग काय, एखाद्या नवा शब्द सापडल्यावर जसा तोच शब्द वारंवार वापरण्याचा उत्साह असतो तसेच या ग्लोबल टेंडरिंगचे झाले आहे. लसीकरणाच्या मुद्द्य़ावर सगळेच ग्लोबल टेंडरिंगच्या मागे लागले आहेत. आता मुंबई महानगरपालिकेने एक कोटी डोस (५० लाख लशी) खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरिंगची तयारी केली आहे, म्हणे. राज्य सरकारने पालिकेला परवानगी दिली आहे. राज्य सरकारला मात्र अजून मुहूर्त सापडलेला नाही. स्वतः मुख्यमंत्री मध्यंतरी फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाले होते की, १२ कोटी डोस विकत घेण्यासाठी एकरकमी पैसे देण्याची आमची तयारी आहे. पण अद्याप सरकारकडून तसे पाऊल उचललेले दिसले नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात की, आम्ही पण ग्लोबल टेंडर काढून लसी विकत घेऊ. पण नंतर ते असेही म्हणतात की, केंद्र सरकारने ग्लोबल टेंडरिंगला परवानगी द्यावी. शिवाय, यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्रही लिहितील. त्यामुळे ग्लोबल टेंडर केंद्रामुळे शक्य होणार आहे की, आपण आपले टेंडरिंग करायचे आहे हे कळायला मार्ग नाही. पण पालिकेचा कारभार राज्याच्या कारभारापेक्षा वेगाने होत आहे असे म्हणायला हरकत नाही. मजेची गोष्ट म्हणजे ज्या पक्षाची सत्ता पालिकेत आहे त्याच पक्षाचे मुख्यमंत्री राज्याच्या सत्तेत आहेत, तरीही ग्लोबल टेंडरिंगच्या बाबतीत ही चढाओढ का हे कळत नाही. एकाचवेळी पालिका आणि राज्याने ग्लोबल टेंडर काढायला हरकत नव्हती. आता यावर असाही सूर उमटू लागला आहे की, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका कशी झटपट कारभार करते आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न असू शकेल. असो. एकदा काय तो ग्लोबल टेंडरिंगचा सोक्षमोक्ष लागू द्या आणि लोकांना लस मिळू द्या. निदान त्यानिमित्ताने केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रम थांबेल आणि लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होऊ शकेल.
मविआ
(अर्थात, महेश विचारे आपला)