रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर एक व्हेल माशाचे पिल्लू वाहून आल्याचा प्रकार समोर आला होता. जिवंत राहण्यासाठी या पिल्लाची धडपड गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. समुद्रातील ओहोटीमुळे हे पिल्लू समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतून बसलं होतं. अखेर त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला अखेर ४० तासांनी समुद्रात पुन्हा सोडण्यात यश आले आहे. गेल्या ४० तासांपासून सरकारच्या विविध यंत्रणा व्हेल माशाच्या पिल्लाला जीवदान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून व्हेल माशाला जीवदान मिळाले आहे.
सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी समुद्राला ओहोटी आली होती. यावेळी एक व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आल्याचं पर्यटकांनी पाहिलं. तसेच, बोटक्लबच्या सदस्यांनाही हा व्हेल मासा दिसला. त्यामुळे त्यांनी तातडीने पावलं उचलत त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, महाकाय व्हेल माशाचं पिल्लू वाळूत रुतून बसलं होतं. त्यानंतर सोमवारपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचे प्रयत्न केले जात होते.
हे ही वाचा:
भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्याला अटक!
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!
कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतके या माशाचे वजन आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला वारंवार अडथळे येत होत होते. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते. शेवटी रात्री ओहोटीच्या वेळी या माशाला दोरीने बांधलं आणि बोटीने ओढून खोल समुद्रात नेण्यात आलं. अखेर, ४० तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात आलं आहे.