माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस

या मुलीने १२वीत मिळविले ४६ टक्के गुण आणि इतिहासात सर्वाधिक गुण

माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस

राजुला हिदामी ही १३ वर्षांची होती, तेव्हा २०१५मध्ये माओवाद्यांनी तिचे अपहरण केले होते. तेव्हा तिला बंडखोरांमध्ये सामील होण्यास भाग पाडले. तिथेच तिला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सुरक्षा दलांसोबत भयानक अशा चकमकीतही तिचा सहभाग होता. या प्रकरणी तिच्यावर तब्बल नऊ गुन्हे दाखलही झाले आहेत. मात्र सन २०१८मध्ये तिने धाडस करून पलायन केले आणि महाराष्ट्रातील गोंदियामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हीच मुलगी आता बारावी उत्तीर्ण झाली असून तिला पोलिस सेवेत भरती व्हायचे आहे. गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात राजुलाने ४६ टक्के गुण मिळवले आहेत.

 

कुरखेडा-कोर्चिखोब्रामेंढा दलम हा माओवादाचा गट सोडल्यानंतर राजुलाने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला होता. ती शाळेत जाऊ लागली आणि दहावीत ४० टक्के गुण मिळवून ती उत्तीर्णही झाली. ‘ती माझ्या कुटुंबाच्या दत्तक मुलीसारखीच आहे. आम्ही तिला पहिल्यांदा देवरीतील शाळेत आठवीमध्ये प्रवेश घेऊन दिला,’ असे औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप अटोले यांनी सांगितले.

 

राजुलाने जेव्हा आत्मसमर्पण केले, तेव्हा अटोले हे गोंदियाचे अतिरिक्त पोलिस पोलिस अधीक्षक होते. तीन वर्षांचा खंड पडूनही तिला पुन्हा प्रवेश मिळाला होता. देवरीच्या नक्षलविरोधी दलाच्या एका पोलिसाने तिला शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली होती, असे पटोले यांनी सांगितले.

 

त्यावेळी नक्षलवादविरोधी पथकातील पोलिसांनी राजुलाचे समुपदेशन केले. त्यामुळेच राजुला हे यश साध्य करू शकली, असेही ते म्हणाले. या पथकातील पोलिस आणि त्याची पत्नी गडचिरोलीत राहणाऱ्या राजुलाच्या आईकडे पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी ते दोघे तहसील कार्यालयातील क्लर्क आणि शिक्षिका असल्याचे सांगून तिच्या आईकडून राजुलाची कागदपत्रे मागितली होती. राजुलाच्या आईने दुसरा विवाह केला होता. त्यामुळे राजुला आदिवासी मुलीच्या वसितगृहातच राहणे योग्य ठरेल, असे पोलिसांनी ठरवले.

हे ही वाचा:

‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

मुलुंडच्या व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करत केली मारहाण

राजुला सध्या एमएचसीआयटीचा कोर्स करत असून पोलिस भरती परीक्षेचे प्रशिक्षण घेत आहे. तिला पोलिस निरीक्षक व्हायचे आहे. राजुलाची हुषारी पाहून ही मुलगी त्यांची कागदपत्रे आणि अन्य नोंदी टॅबवर करेल, असे माओवाद्यंना वाटले होते. मात्र तसे व्हायचे नव्हते. तिने वेगळ्याच विषयात प्रावीण्य मिळवले. बारावीत तिला सर्वाधिक गुण मिळाले ते इतिहास विषयात. त्यात राजुला हिला ६४ गुण मिळाले आहेत.

Exit mobile version