जन्मतः दोन्ही हात नसलेल्या तरुणाशी विवाह करून तरुणीने त्यांच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमकहाणीला नव्याने ओळख दिली आहे.
तरुणीने तरुणाच्या कर्तृत्वावर आणि कर्तबगारीवर विश्वास ठेवला आणि त्यातून ते विवाह बंधनात अडकले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असाच हा विषय. यातील तरुण म्हणजे ऋषिकेश बाळकृष्ण मोरे आणि तरुणी म्हणजे प्राची.
ऋषिकेश हा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावाचा आणी प्राची ही सांगवीची. ऋषिकेश हा दिव्यांग आहे. त्याला जन्मतःच दोन्ही हात नाहीत. मात्र, ऋषिकेशने कधीही या गोष्टीचा न्यूनगंड बाळगला नाही. बालपणापासूनच त्याच्यातील या न्युनत्वाची जागा अफाट जिद्दीने घेतली. दहावीच्या परीक्षेत त्याने पायाने पेपर लिहित तब्बल ९० टक्के गुण मिळवले होते. संगणकाच्या परीक्षेतही त्याने १०० पैकी १०० गुण मिळवले होते.
हे ही वाचा:
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
पुन्हा एकदा काँग्रेसने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७वे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला
कधी मिळणार आहे, चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत?
ऋषिकेश पायाने उत्कृष्ट चित्र काढतो. अलीकडच्या काळात संगीत क्षेत्रात त्याला रस वाटू लागला आणि संगीत त्याचा छंद बनला. त्यातून ऋषिकेशचे उत्तम संगीत संयोजक म्हणून नाव झाले. ‘मन चांदण झालं’, ‘जगण्याच्या खेळामंधी’, ‘लत इष्काची’ यासारख्या दर्जेदार अल्बमची त्याने निर्मिती केली आहे. त्या दरम्यान ऋषिकेशशी प्राचीशी ओळख झाली. प्राची उत्तम गाते. ऋषिकेश आणि प्राची फलटणमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकतात. त्यांच्या परिचयाचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. अलीकडेच प्राचीने ऋषिकेशसोबत लग्नाचा निर्णय घेतला. अर्थातच त्याला विरोध झाला. मात्र, कोणत्याही विरोधाला न जुमानता प्राची आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यातून त्यांचा हा अनोखा विवाह पार पडला.