स्टार संस्कृती नको! क्रिकेटला प्राधान्य देईल त्याचीच निवड करा!

सुनील गावस्कर यांनी खेळाडू, बीसीसीआयला दिल्या कानपिचक्या

स्टार संस्कृती नको! क्रिकेटला प्राधान्य देईल त्याचीच निवड करा!

भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३-१ अशी कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे.

गावस्कर म्हणतात की, भारतीय संघात ‘स्टार संस्कृती’ वरचढ झाली आहे. भारतीय क्रिकेटच्या भवितव्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर ६ विकेटनी मात केली आणि कसोटी मालिका जिंकली. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा भारताचा मार्ग या पराभवामुळे खुंटला.

हे ही वाचा:

आयएनएस तुशिलचे सेनेगलच्या डकारमध्ये आगमन

बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

देशाच्या राजधानीला विकासाची गरज, ‘आप-दा’ची नाही!

हृदयद्रावक घटना : पाळीव प्राण्यांच्या दुकानात ५७९ प्राण्यांचा गुदमरून मृत्यू

गावस्कर म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी क्रिकेटप्रति आपली निष्ठा सिद्ध केली पाहिजे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबाबत कठोर पाऊल उचलायला हवे. प्रत्येक खेळाडूची जबाबदारी बोर्डाने निश्चित करायला हवी.

गावस्कर म्हणाले की, पुढील ८-१० दिवस खूप महत्त्वाचे आहेत. प्रामाणिक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे स्टार संस्कृती संपुष्टात आली पाहिजे. भारतीय क्रिकेटप्रति निष्ठा याला पर्याय नाही. अगदी महत्वाचे वैद्यकीय कारण सोडले तर प्रत्येक खेळाडू संघासाठी उपलब्ध हवाच. जर एखादा खेळाडू १०० टक्के कामगिरी करत नसेल तर त्याचा संघनिवडीसाठी विचार होऊ नये.

गावस्कर म्हणतात की, खेळाडू अर्धा क्रिकेटच्या मैदानावर आणि अर्धा अन्यत्र असे व्हायला नको. कुणाचेही लाड नकोत. आता लागलेला निकाल निराशाजनक आहे. आपण जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत हवे होतो, पण त्यात आपण अपयशी ठरलो.

गावस्करांनी बीसीसीआयचेही कान पकडले. ते म्हणाले की, बीसीसीआयने खेळाडूंचे फक्त कौतुक करण्याच्या भूमिकेत फक्त असता कामा नये. त्यांनी खेळाडूंना सांगायला हवे की, क्रिकेट हे सर्वात प्रथम आहे. जर क्रिकेट हा तुमचा प्राधान्यक्रम नसेल तर तुमची निवड केली जाणार नाही.

काही खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास नकार देतात, टाळाटाळ करतात असा वारंवार आक्षेप घेतला जातो, त्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांचे हे विधान महत्वाचे होते.

Exit mobile version