रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडलेली स्फोटकांनी भरलेली संशयास्पद बोट आणि त्या पाठोपाठ मुंबई च्या वाहतूक पोलिसांना आलेला धमकीचा संदेश या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी गेटवे ऑफ इंडिया बंद करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील काही दिवस गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीसांनी म्हटलं आहे. गणेशोत्सव सणही तोंडावर आलेला असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येनं येणाऱ्या परदेशी पर्यटकांची काही दिवस गैरसोय होणार आहे.
मागील आठवड्यात गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी एके ४७ रायफल आणि काडतुसे भरलेली एक संशयास्पद हरिहरेश्वच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट देण्यात आला. मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत स्पष्ट करताना या बोटीचा दहशतवादाशी संबंध असल्याचे आढळून आले नाही, असं सांगितलं होतं.
त्यापाठोपाठ मुंबई वाहतूक पोलिसांच्या वरळी नियंत्रण क्षेत्रात धमकीचा संदेश आला. या धमकीमध्ये २६/११ सारखा हल्ला करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. हा मेसेज पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरून आला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणखी सतर्क झाली. त्यामुळेच ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया बंद केला होता. गेटवेवर विशेष दले तैनात आहेत आणि कमांडो पूर्ण सतर्क आहेत. याठिकाणी बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपद गमावण्याची वेळ?
मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यावर असणार कॅगचा अंकुश
मुंबईच्या खड्ड्यांतली ‘मलई’ येत्या दोन वर्षांत बंद
‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’
वाहनांची कडक तपासणी सुरू
मुख्य गेटवर पोलिसांचे पथक हजर असून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिस व्हॅनही तैनात करण्यात आल्या असून पोलिसांच्या अनेक तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, गेटवे बंद झाल्याची माहिती नसल्याने पर्यटक दु:खी आहेत. प्रत्येकजण दुरूनच फोटो काढतोय. काही केरळ, राजस्थान आणि काही यूपीमधून आले आहेत, पण आता पर्यटक परतत आहेत.