गांधींच्या हिंदू राष्ट्रभक्तीची चिकीत्सा

२००३ साली डॉ. जे. के. बजाज, प्रो. एम. डी. श्रीनिवास आणि ए. पी. जोशी या त्रिकुटाने दोन पुस्तके लिहीली. एक भारताच्या धर्मवार लोकसंख्येविषयी 'रिलीजीयस डेमोग्राफी ऑफ इंडिया' नावाने दुसरे "मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रीऑट: बॅग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराज”. पहिल्या पुस्तकात अत्यंत खळबळजनक तपशील असून सुद्धा देशभरात त्याची फार चर्चा झाली नाही. परंतु दुस-या पुस्तकाला रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. परंतु या पुस्तकातील मतं खरोखरच तर्काच्या कसोटीवर टीकणारी आहेत का? खरोखर महात्मा गांधी हे हिंदू देशभक्त होते काय याबाबत दिल्लीतील प्रियदशी दत्ता या नामवंत विचारवंताचा लेख...

गांधींच्या हिंदू राष्ट्रभक्तीची चिकीत्सा

‘रिलीजीयस डेमोग्राफी ऑफ इंडिया’ या पुस्तकात  १८८१ ते १९९१ मधील जनगणनेनुसार भारतातील धार्मिक लोकसंख्येच्या बदलत्या गणिताबाबत विश्लेषण केले आहे. भारताच्या फाळणीने या देशातील हिंदू मुस्लीम संबंधांना परीमाण दिले. पुस्तकात लेखक त्रयींनी दिलेल्या निष्कर्षामुसार फाळणीने हिंदू-मुस्लीम प्रश्न सुटला नाही. या अहवालानुसार, भारतात मुस्लीम समाज, खास करून देशाच्या सीमेलगतच्या किंवा किनारपट्टी नजीकच्या काही भागांमध्ये, झपाट्याने वाढतोय. देशातील अनेक जिल्ह्यात बहुतांश वेळा खेटून असलेल्या जिल्ह्यांत मुस्लीम लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. जम्मू काश्मीर, पश्चिमी उत्तर प्रदेश, बिहारचा ईशान्य भाग, पश्चिम बंगाल आणि आसाम ते थेट बांगलादेश पर्यंत एक मुस्लीमबहुल जिल्ह्यांचा एक पट्टाच तयार झालाय.

फार पूर्वी १९१२ मध्ये कर्नल यु. एन. मुखर्जी यांनी १८८१ ते १९११ दरम्यानच्या जनगणनेचा आधार घेत हिंदू समाज लोप पावतोय असे विधान केले होते. जनगणनेतील आकड्यांवरून डॉ. बॅनर्जी यांची टीमने असा निष्कर्ष काढला होता कि ब्रिटीश राजवटीतील भारतापेक्षा स्वंतंत्र भारतात लोकसंख्येतील बदल फार गंभीर होते. अर्थात भारतातील बदलत्या राजकीय परिस्थितीशिवाय हे शक्य नव्हते.

सत्ताधाऱ्यांनी भारताचे भविष्य किंबहुना समोर ठाकलेली आव्हाने दर्शवणाऱ्या ह्या पुस्तकाची दाखल घ्यायला हवी होती. परंतु काही वर्षांत २००४ मध्ये वाजपेयी सरकार पायउतार झाले आणि सत्तारूढ यूपीए सरकारची धोरणे वाढत्या मुस्लीम लोकसंख्येला पूरक होती. त्या सरकारने मुस्लीम समाजाच्या विकासासाठी ‘सच्चर कमिटी’ बनविली, कायम मुस्लीम मंत्री असलेले स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय’ स्थापले आणि अल्पसंख्यांकासाठी लाखो स्कॉलरशिप जाहीर केल्या पण त्यातला सिंहाचा वाटा मात्र मुस्लिमांनाच मिळाला. डॉ. बॅनर्जींनी आधीच ताडल्यानुसार मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव सरकारी धोरणांवर पडू लागला.

परंतु, त्यांच्या विचारधारेशी सहमत असणाऱ्यांनादेखील त्यांच्या कार्याची महती पटली नव्हती असे दिसते. फार क्वचितच त्यांचे लिखाण वाचले किंवा संदर्भीले जायचे. जरी डॉ. बजाज यांची ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’ ही संस्था मध्य दिल्लीतील स्वतःच्या मालकीच्या इमारतीतून कारभार करते (म्हणजे त्यांच्याकडे देणग्यांची कमी नसावी) परंतु त्यांना ज्यांच्याकडून आशा होती अशा लोकांनी मात्र त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याचे फारसे कौतुक केले नाही.

२०१४ पासून भारत एका सक्षम पंतप्रधानाच्या हातात असल्यासारखे वाटत आहे. सहाजिकच राष्ट्रवादी विचारांच्या हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, अल्पसंख्याक (मुस्लीम असे वाचावे) या काळातही मुस्लीमांसाठी मोदी सरकारने नई मंजिल, उस्ताद आणि गरीब नवाज सारख्या नवीन योजना आणल्या. २०१९-२० या आर्थिक वर्षात माध्यमिकपूर्व, माध्यमिकपश्चात आणि मेरीट-कम-मीन्स अशा शिष्यवृत्ती योजनेतून ₹२,०८२ करोड वाटण्यात आले. म्हणजे यात २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ₹१,७३९ करोड घसघशीत वाढ झाली. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (पूर्वीचा अल्पसंख्याकांसाठी असलेला विविध क्षेत्रातील विकास कार्यक्रम) याची युपीए काळातील केवळ ९० जिल्ह्यांपुरती असलेली व्याप्ती ३०८ जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात आली. कॉंग्रेसच्या काळातील धार्मिक अल्पसंख्याकांशी निगडीत सर्व संस्था उत्तमरित्या चालू आहेत. परंतु, या सरकारने भाषिक अल्पसंख्याकांसाठी असलेले आयुक्तपद एक घटनात्मक पद असूनही कायम रिकामे ठेवले. हे पुस्तक फारसे चर्चे आले नाही. एका विशिष्ट गटापुरता या पुस्तकाचा विचार झाला. दुसरे पुस्तक मात्र नशीबवान ठरले. परंतु त्यातील तपशीलाबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.

गांधींवरील हा १००० पानी ग्रंथ लिहून म्हणजे डॉ. बॅनर्जी आणि प्रो. श्रीनिवास यांनी दिलेला आश्चर्याचा धक्काच आहे. “मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रीऑट: बॅग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराज” या नावाचे हे पुस्तक गांधींचे स्वतःचे पत्रव्यवहार, संभाषणे अशा गोष्टींवर आधारित आहे. स्वाभाविकच हे पुस्तक १९०८ पूर्वी जेव्हा हिंद स्वराज प्रकाशित होत होते त्या काळावर बेतले आहे. १९१५ मध्ये भारतात परतण्यापूर्वी गांधी २४ वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते. या दोन लेखकांनी एवढे कष्ट घेण्याएवढा हा विषय खरच गंभीर आहे का? धर्मवार लोकसंख्येविषयी त्यांच्या आधीच्या लिखाणाइतके हे पुस्तक भारताच्या भविष्यात खरच काही योगदान देईल का?

पुस्तकाचा एकूण गोषवारा हा आहे कि गांधींचा राजकीय दृष्टीकोन हा प्रगल्भ हिंदू विचारांवर आधारित होता. गांधीची भाषणे आणि पत्रे ज्यांनी वाचली असतील त्यांना हे पटेल. “मी एक हिंदू म्हणून बोलतोय”, “आपले हिंदू साहित्य असे सांगते कि…” अशी वाक्ये गांधींच्या साहित्यात वारंवार आढळतात. भारतीय जनामानसावरील इंग्रजांचा पगडा कमी करण्यासाठी सत्याग्रह, आश्रम, ब्रम्हचर्य, रामराज्य, उपवास, मौन, दरिद्र नारायण, हरिजन असे अनेक प्रकार त्यांनी मुख्यप्रवाहात वापरले. परंतु, हिंदू विचारांनी प्रभावित असलेली अशी व्यक्ती तुर्कस्तानच्या सुलतानाला पुन्हा सत्ता मिळावी म्हणून हिरीरीने खिलाफत चळवळीला का पाठींबा देते? गांधी प्रत्येक राजकीय कृतीपूर्वी हिंदू-मुस्लीम ऐक्याची अट ठेवत. त्यासाठी त्यांनी अगदी “रघुपती राघव राजा राम’ सारख्या भजनातही बदल करून त्यात अल्ला, रहीम आणि करीम सारखे शब्द घुसविले. गांधींनी मलबारीतील लुटारू मोपला जमातीला “देवाला घाबरणारे लोक” म्हटले आणि १९२६ च्या गुवाहाटी कॉंगेसमध्ये स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणाऱ्या अब्दुल रशीदचा निषेध करण्यास नकार दिला, एवढेच नाही तर नंतर त्याला कुठलेही गैरकृत्य न केलेला “भाऊ” म्हटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या “पाकिस्तान कि भारताची फाळणी” या सुप्रसिद्ध पुस्तकात हिंदू- मुस्लीम ऐक्यासाठी गांधी ज्या थराला गेले त्या थराला एखादा विवेकी माणूस जाऊ शकतो का असे म्हटले आहे. अर्थात, गांधी हिंदूंच्या हिताला हरताळ फासला पण मुस्लिमांचेही ते भले करू शकले नाहीत. खिलाफत-असहकार चळवळीचा विचका झाल्यावर मुसलमानांनी स्वतःला गांधींच्या नेतृत्वापासून फारकत घेतली. किंबहुना, मुस्तफा कर्नल (केमाल) पाशाने केलेल्या कॅलिफेटच्या पतनाचा ठपकाही मुस्लिमांनी हिंदुंवर ठेवला. प्रत्येक मुस्लिमामध्ये धमक आहे आणि प्रत्येक हिंदू भित्रा आहे हे गांधीनी मान्य केले.

ऑगस्ट १९४६ मधील कलकत्ता भीषण हत्याकांडामागील हुसेन शहीद सोहरावर्दीशी गांधीनी एवढी जवळीक केली होती कि सुबिमल दत्त (जे नंतर भारताचे परराष्ट्र सचिव होते) यांनी सप्टेंबर, १९४७ मध्ये त्याला नवी दिल्लीतील बिर्ला हाउस मध्ये गांधीच्या प्रार्थनेमध्ये पाहिल्याचे त्यांच्या “विथ नेहरू इन फॉरेन ऑफिस” या पुस्तकात (पृष्ठ क्र १८ वर) लिहिले आहे. हे एका हिंदू देशभक्ताचे कृत्य असू शकते का?

दक्षिण आफ्रिकेतील गांधींना हिंदू देशभक्त संबोधून काय साधायचे आहे हे अनाकलनीय आहे. दक्षिण आफ्रिकेत हिंदू-मुस्लीम हा प्रश्नच नव्हता किंवा परकीय वसाहतीच्या प्रश्नापुढे नगण्य होता. बहुसंख्य कृष्णवर्णीय मूळ निवासी आणि मुठभर गौरवर्णीय शासकांसमोर भारातीतून तेथे गेलेल्या लोकांची संख्या तुलनेने फार कमी होती. गांधींच्या हिंदू विचारांची खरी परीक्षा खिलाफत चळवळीपासून मुस्लीम लीगच्या फाळणीच्या मागणीपर्यंतच्या कालखंडात भारतातच होती. पण ते या परीक्षेत सपशेल नापास झाले.

हिंदूंची रक्षक संस्था म्हणून हिंदू समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील आपला विश्वास कायम ठेवेलही परंतु संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनराव भागवत यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करणे म्हणजे कदाचित “संघाचे गांधीकरण” होण्याचे द्योतक आहे. जर गांधी हिंदू देशभक्त असते तर डॉ. हेडगेवारांना १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्याची गरजच भासली नसती. हिंद स्वराज किंवा भारतीय होम रूल (१९०८) च्या माध्यमातून समोर आलेले गांधी हे रेल्वे, मशिनरी, न्यायालये, संसद, अशा सर्व विकास आणि औद्योगिकरणापासून स्वतःला अलिप्त ठेवणारे व्यक्ती होते. मग आज ज्या न्यू इंडिया चा एवढा गाजावाजा होतोय त्या दृष्टीने हे योग्य आहे का?

लेखक हे दिल्लीस्थित साहित्यिक आणि स्वतंत्र संशोधक आहेत. येथे मांडलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

-अनुवाद शिवानंद नाडकर्णी

Exit mobile version