एका आदिवासीने प्रेशर कूकरमध्ये ठेवलेल्या आईडी स्फोटकांबाबत माहिती दिल्याने सोमवारी माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील किमान डझनभर पोलिसांचा जीव वाचला.
खबऱ्याने दिलेल्या माहितीमुळे गडचिरोली पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने हा बॉम्ब शोधून ते यशस्वीपणे निकामी केला. या बॉम्बचा स्फोट झाला असता तर, मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे सैनिक जीवानिशी गेले असते.
सुमारे दोन किलो वजनाची ही स्फोटके कुकरमध्ये बंद करण्यात आली होती आणि रस्त्याच्या कडेला एका दगडाखाली लपवून ठेवली होती. थोड्या थोड्या कालावधीने शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दले याच रस्त्याचा वापर करतात. सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या स्फोटकाच्या तपासासाठी अत्याधुनिक रडारचा वापर केला.
गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व कमी करण्याचा सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याला यश मिळत असताना माओवादीही लढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करत आहेत. त्याचाच भाग म्हणून ही स्फोटके ठेवण्यात आली होती, जेणेकरून सुरक्षा दलाची अधिकाधिक जीवितहानी व्हावी, असा त्यांचा हेतू होता. ही स्फोटके कोटगुल पोलिस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर आणि गोंधरी जंगलाच्या दिशेने ठेवण्यात आली होती. सी- ६०चे कमांडो जंगलात माओवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवताना सहसा याच मार्गावरून जातात. त्यामुळे हा स्फोट झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पाल यांनी दिली.
हे ही वाचा:
पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!
खबऱ्यांनी दिलेली माहिती म्हणजे स्थानिकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांच्या पोलिसांप्रति वाढलेल्या विश्वासाचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. ‘दादालोरा खिडकी आणि अन्य उपक्रमांद्वारे पोलिसांनी स्थानिकांचा विश्वास कमावला आहे. त्यामुळे सुमारे चार लाख आदिवासींना विविध योजनांचा लाभ घेता आला,’ अशी माहिती त्यांनी दिली.