एका वर्षात दोन चित्रपटांनी ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याची ऐतिहासिक कामगिरी पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत घडली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर सनी देओल आणि आमिषा पटेल अभिनित ‘गदर २’नेही या क्लबमध्ये धडक दिली आहे. ‘गदर २’ चित्रपटाने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या १२व्या दिवसांतच ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. तर, ‘पठाण’ चित्रपटाने ४०० कोटींच्या क्लबमध्ये ११व्या दिवशीच धडक दिली होती.
मंगळवारचा दिवस ‘गदर२’च्या सर्व चित्रपट कलाकारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला. प्रदर्शनाच्या १२व्या दिवशीच म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी ‘गदर२’ने देशात शानदार कामगिरी करून सुमारे ११.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई ४०० कोटी १० लाखांवर पोहोचली. ‘गदर२’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील दुसरा हिंदी चित्रपट आहे, ज्याने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.
हे ही वाचा:
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद
मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’
या व्यतिरिक्त ‘बाहुबली २’ आणि ‘केजीएफ २’ या अन्यभाषिक चित्रपटांनी अशी कामगिरी केली आहे. ‘बाहुबली २’ हा चित्रपट तेलुगू होता, तर ‘केजीएफ २’ हा चित्रपट कन्नड होता. ‘बाहुबली२’चे दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी तर, ‘केजीएफ २’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तर, ‘गदर २’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.
‘गदर २’ चित्रपटाचे पुढच्या आठवड्याचे तिकीट बुकिंगही जोरात सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांतही या चित्रपटाने अशीच कामगिरी केल्यास सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ‘पठाण’ला हा चित्रपट मागे टाकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.