जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या जी-२० टुरिझम वर्किंग ग्रुपच्या परिषदेपूर्वी या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. गुलमर्गमध्ये जी-२० च्या बैठकीदरम्यान दहशतवादी संघटनांनी २६/११ सारखा हल्ला करण्याची योजना आखली होती. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून दहशतवाद्यांनी गुलमर्गमधील ज्या हॉटेलमध्ये परदेशी पाहुण्यांने थांबणार होते, याच हॉटेलला लक्ष्य करण्याची योजना आखली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या हॉटेलचा ड्रायव्हर पकडला गेल्याने संपूर्ण कट उघडकीस आला आहे. या कारणामुळे आता पाहुणे गुलमर्गला जाणार नाहीत.
सुरक्षा दलांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ओव्हर ग्राउंड वर्करला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या खुलाशानंतर सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. जी-२० च्या ठिकाणाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ओजीडब्ल्यू दहशतवाद्यांना रसद समर्थन, रोख रक्कम, निवारा आणि इतर पायाभूत सुविधांसह मदत करतात, ज्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या सशस्त्र गट आणि दहशतवादी संघटना कार्यरत असल्याच्या बातम्या येत आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरक्षा दलांनी फारुख अहमद वानीला अटक केली होती. ‘
वाणी हॉटेलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचा
बारामुल्लाच्या हैगाम सोपोरचा रहिवासी फारुख अहमद वानी गुलमर्गमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ओजीडब्ल्यू म्हणून दहशतवादी संघटनांशी संबंधित होता आणि सीमेपलीकडील आयएसआयच्या अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कातही होता.
दहशतवाद्यांनी २६/११ सारखा हल्ला करण्याचा कट रचला होता
चौकशीत वानीने सांगितले की, दहशतवाद्यांचा उद्देश हॉटेलमध्ये घुसून परदेशी मान्यवरांसह तेथे उपस्थित लोकांना लक्ष्य करणे हा होता, ज्याप्रमाणे मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर गोळीबार केला आणि लोकांना बंधक बनवले.
हे ही वाचा:
तीन मोलकरणींनी केली ४० लाखांची साफ’सफाई’!
…आणि बायडेन मोदींना म्हणाले, मला तुमची स्वाक्षरी घ्यायला हवी!
धरसोड कसली? हे आधीच ठरलं होतं…
कुठे आहे विरोधी ऐक्य? कर्नाटक शपथविधीला सोनिया, ममता आणि ठाकरे गैरहजर !
सीसीटीव्ही आणि ड्रोनवर नजर ठेवली जात आहे
काश्मीरमधील जी-२० परिषदेदरम्यान एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच संपूर्ण काश्मीरमधील, विशेषत: श्रीनगरमधील सर्व हालचालींवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
पाहुण्यांना गुलमर्गचं नैसर्गिक सौंदर्य पाहता येणार नाही?
दहशतवादी हल्ला उघडकीस आल्यानंतर सध्या परदेशी पाहुण्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यापुढे प्रसिद्ध हिल रिसॉर्ट गुलमर्गमध्ये पाहुण्यांना नेले जाणार नाही. गुप्तचर अहवालानुसार जी-२० परिषदेतील हल्ल्याचा कट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आखला होता. श्रीनगर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून खोऱ्यात आत्मघातकी हल्ला होण्याची शक्यता आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फोर्सचा दहशतवादी तनवीर अहमद राठेर याने खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. जैशचे दहशतवादी टेलिग्रामवर सक्रिय असून खोऱ्यात राजौरीसारखी दहशतवादी घटना घडवून अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत. जी-२० परिषदेत काश्मीरला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मुद्दा बनवून भारताची प्रतिमा मलीन करणे हा त्यांचा हेतू आहे.
या भागात सतर्कतेचा इशारा
डाउनटाउन, दलगेट, परिंपोरा, फोरशोर, हैदरपोरा, हाईवे, दक्षिण कश्मीर, नरबल, सोपोर, गांदरबल, ९० फीट, गुलमर्ग.